चंद्रपूर : मूल शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती ‘डायल ११२’ या आपत्कालीन हेल्पलाईनवर वारंवार देऊन पोलिसांची धावपळ उडविणाऱ्या २४ वर्षीय युवकाला मूल पोलिसांनी तातडीने अटक केली.रोशन बंडू मेश्राम (रा. वॉर्ड क्र. १६, मूल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (२३ जुलै) रात्री ९.४३ ते १०.१५ या कालावधीत ‘डायल ११२’ या आपत्कालीन हेल्पलाईनवर एका मोबाईल क्रमांकावरून वारंवार फोन करण्यात आले. फोन करणाऱ्या व्यक्तीने, “मूल शहरात रोशन मेश्राम नावाचा इसम बॉम्बस्फोट घडवून आणणार आहे. तातडीने मदत पाठवा,” असा गंभीर संदेश दिला.
संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क
संदेशाचे गांभीर्य लक्षात घेऊन मूल पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्रीकांत गजानन वाढई आणि सहाय्यक फौजदार योगेश्वर भेंडारे, जे त्या वेळी ‘डायल ११२’च्या आपत्कालीन वाहनावर रात्रपाळीचे कर्तव्य बजावत होते, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका टाळण्यासाठी पोलिसांनी संबंधित परिसराची सखोल तपासणी केली. मात्र, चौकशीअंती बॉम्बस्फोटाचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. हेल्पलाईनवर देण्यात आलेली माहिती पूर्णपणे खोटी आणि पोलिसांची दिशाभूल करणारी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दारूच्या नशेत केला फोन
यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान वॉर्ड क्रमांक १६ मधील दुर्गा मंदिरासमोरील रस्त्यावर रोशन बंडू मेश्राम हा दारूच्या नशेत आढळून आला. चौकशीदरम्यान त्यानेच दारूच्या अमलाखाली आपत्कालीन क्रमांकावर खोटे फोन केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानुसार, तो घटनेच्या वेळी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.
खोट्या माहितीमुळे धावपळ
पोलिसांच्या माहितीनुसार, कोणतेही कारण नसताना केवळ पोलिसांची दिशाभूल करण्याच्या आणि खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने आरोपीने ही खोटी माहिती दिली. त्यामुळे पोलीस यंत्रणा, मनुष्यबळ आणि शासकीय संसाधनांचा विनाकारण वापर झाला.या प्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत वाढई यांच्या तक्रारीवरून मूल पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.
पोलिसांचे आवाहन
दरम्यान, आपत्कालीन हेल्पलाईनवर खोटी माहिती देणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या खोडसाळ कृत्यांमुळे प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत मदतीची गरज असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यात विलंब होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी ‘डायल ११२’ या सेवेचा वापर केवळ वास्तविक आपत्कालीन प्रसंगीच करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
