नागपूर : जंगलातील अधिवास आणि अन्नाच्या शोधात रस्ता ओलांडण्यासाठी बाहेर पडलेल्या एका दुर्मिळ नर चांदी अस्वलाचा प्रवास चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्गावरच संपला. आगडी गावाजवळील जंगल परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत या अस्वलाचा मृत्यू झाला. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी उपशमन उपाययोजनांची वर्षानुवर्षे प्रतीक्षा सुरू असतानाच या महामार्गाने आणखी एका दुर्मिळ प्राण्याचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे, याच मार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चांदी अस्वलांची संख्या आता चारवर पोहोचली आहे.
महामार्गावरील भरधाव वाहनाचा बळी
जानाळा बिटातील कक्ष क्रमांक ७१४ मध्ये हे अस्वल मृतावस्थेत आढळले. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य शशांक मोहरकर यांना महामार्गावरून जात असताना हा प्रकार दिसून आला. त्यांनी तत्काळ संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे आणि नाजिश अली यांना माहिती दिली. त्यानंतर वन विभागालाही कळविण्यात आले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
हा महामार्ग अपघाताचा सापळा
हा अपघात ज्या महामार्गावर झाला तो केवळ वाहतुकीचा मार्ग नसून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य आणि तेलंगणातील कावल व्याघ्र प्रकल्प यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या वन्यजीव मार्गिकेतून जातो. त्यामुळे वाघ, अस्वल, बिबट आणि इतर वन्यजीव वारंवार रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेचे बळी ठरत आहेत.
ऑक्टोबर २०२५ मध्ये याच महामार्गावरील केसलाघाट परिसरात ‘के-मार्क’ वाघिणीच्या बछड्याचाही अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. वन्यजीव संरक्षणासाठी अंडरपास, वेगनियंत्रण, चेतावणी फलक आणि इतर उपशमन उपाययोजना राबविण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही.
मॅटिगेशन मेजर्स अजूनही प्रलंबित
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, राष्ट्रीय महामार्ग विभागाने २०२४-२५ मध्ये वन्यजीव संरक्षणासाठी उपशमन उपाययोजनांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविल्याचे सांगितले होते. मात्र २०२६ चे अर्धे वर्ष उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, जंगलाच्या दोन भागांना जोडणारा हा रस्ता वन्यजीवांसाठी अक्षरशः ‘डेथ ट्रॅप’ ठरत असल्याची भावना पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
वन्यजीवांच्या हालचालींना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी अंडरपास, वेगमर्यादा आणि अन्य उपाययोजना तातडीने राबविण्यात आल्या नाहीत, तर अशा घटनांची पुनरावृत्ती थांबणार नाही, असा इशाराही वन्यजीव अभ्यासकांनी दिला आहे.
