चंद्रपूर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी सात वाजताचे सुमारास मूल शहरातील नागपूर मार्गावर घडली. लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर हा भीषण अपघात झाला. राहुल नारायण पाल (३५) आणि त्यांची तीन वर्षांची चिमुकली मुलगी ईशा राहुल पाल अशी मृतांची नावे आहेत.

राहुल पाल हे बाजार आटोपून मुलगी ईशाला सोबत घेऊन दुचाकीने बोंडाळा (भूज) गावाकडे परतत होते. दरम्यान, लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर समोरून आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, राहुल आणि ईशा दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चिमुकल्या ईशाच्या मृत्यूने हळहळ

अवघ्या तीन वर्षांच्या ईशाचा वडिलांसोबत झालेला दुर्दैवी मृत्यू मन हेलावून टाकणारा ठरला. एकाच अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाल्याने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बोंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मूल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात आली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टरबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून, पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.