चंद्रपूर : या जिल्ह्यातील मुल शहरात एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग ‘कॉपीमुक्त’ परीक्षेचे दावे करत असताना, दुसरीकडे मुल येथील सर्वोदय कॉलेजमध्ये कॉपीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. येथे ३०० रुपये द्या आणि मोबाईलमध्ये कॉपी करा असा उपक्रम राबविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे हे विद्यार्थी कोणत्याही साध्या परीक्षेला बसलेले नाहीत, तर ते बी.ए. प्रशासकीय सेवा (Civil Services) या विषयाचा पेपर देत आहेत. उद्याचे अधिकारी घडवणाऱ्या या परीक्षेचा पायाच भ्रष्टाचारावर आधारलेला दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय की, विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन आहेत आणि ते कोणतीही भीती न बाळगता गुगलवर उत्तरे शोधून पेपर सोडवत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या परीक्षा केंद्रावरील सोयीसुविधांचाही बोजवारा उडाला आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) अंतर्गत येणाऱ्या या कॉलेजमध्ये सुमारे ४०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

मात्र, एका बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवण्यात आले असून, जागा नसल्याने अनेक विद्यार्थी चक्क जमिनीवर बसून पेपर लिहीत आहेत. इतकेच नाही तर येथे साध्या शौचालयाचीही सोय नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार कॉलेज प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून ३०० रुपये घेऊन त्यांना मोबाईलवरून कॉपी करण्याची परवानगी दिली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि स्वबळावर परीक्षा देऊ इच्छित होते, त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत केंद्राबाहेर धाव घेतली.

परिक्षेला बसलेले विद्यार्थी

१५ एप्रिलपासून सुरू झालेली ही परीक्षा ८ मे पर्यंत चालणार आहे. पण प्रश्न असा पडतो की, जर अशा प्रकारे कॉपी करून विद्यार्थी ‘प्रशासकीय सेवे’त जाणार असतील, तर उद्याच्या प्रशासनाचा दर्जा काय असेल? विद्यापीठ आणि प्रशासन या दोषी कॉलेजवर कारवाई करणार की भ्रष्टाचाराचा हा बाजार असाच सुरू राहणार?

या प्रकरणाकडे चंद्रपूर जिल्हा प्रशासन तसेच शिक्षण विभागने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तसेच शिक्षण विभागाकडे तक्रार देखील कुणी केलेली नाही त्यामुळे हा प्रकार येथे सुरू आहे.