चंद्रपूर : शाळकरी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील चित्रफित तयार करून ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार मूल शहरात उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका पीडित मुलीच्या वडीलांनी केलेल्या तक्रारीवरून चार मुलांविरुद्ध मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली असून तपासादरम्यान आणखी गंभीर बाबी समोर येत आहेत.

वेदांत पुरुषोत्तम बुरांडे (वय २१, रा. मूल),प्रारब्ध कीर्तीवर (वय २०, ) आणि कृष्णा योगेश व्यास (वय १९, रा. मूल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान पीडित मुलीनी सोन्याचे दागिने विकून दिलेल्या खंडणीतून आरोपी मुलांनी बुलेट व आयफोन खरेदी केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार, आरोपींनी स्नॅपचॅटच्या माध्यमातून संबंधित मुलींसोबत ओळख वाढवून तिच्याशी मैत्री केली.काही महिन्यांतच त्यांनी तिचा विश्वास संपादन करत जवळीक निर्माण केली.यानंतर आरोपींनी तरुणीसोबतचे काही खासगी व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.बदनामीच्या भीतीने संबंधित तरुणीने आरोपींना सोन्याचे दागिने दिले.

आरोपींनी हे दागिने गडचिरोली येथील सोनाराकडे विकले आणि त्या पैशांतून महागडी बुलेट मोटारसायकल, अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल तसेच इतर चैनीच्या वस्तू खरेदी करून मौजमजा केल्याचे तपासात उघड झाले आहे. पीडित तरुणीने धाडस करून पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली.

त्यांच्या ताब्यातून सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल, १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच ३ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान,पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजीव अमर डोंगरे (वय २०, रा. मूल)या तरुणानेही स्नॅपचॅटवरून दोन मुलींशी मैत्री करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.संबंधित पीडितांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिस तपास सुरू असून या प्रकरणाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या आरोपींनी आणखी काही मुलीची फसवणूक केली असेल तर पोलिसांशी संपर्क करून तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

ज्या हॉटेलमध्ये हे गैरप्रकार चालायचे, ते हॉटेलला प्रशासनाने कुलूप लावले असून पुढील तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून सदर प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी केली आहे.