चंद्रपूर : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षातील वाढत्या अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांमधूनही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. महापालिकेच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे एक पोस्टर आणि त्यातील संदेश समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक होत असून, त्यातून शहरातील विकासकामे ठप्प झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकत भाजप व काँग्रेस हे दोन पक्ष कागदावर एक दिसत असले तरी प्रत्यक्षात माजी मंत्री आमदार मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांचे चार वेगवेगळे पक्षीय गट सक्रीय आहेत. त्यामुळेच सर्व गाेंळध उडाला आहे.

भाजप व काँग्रेसमध्ये गटबाजी

‘सहा महिने पूर्ण… विकास शून्य, फक्त गटबाजीचे राजकारण सुरू!’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या पोस्टरमध्ये काँग्रेस आणि भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर उपरोधिक भाष्य करण्यात आले आहे. भाजप गट क्रमांक एक, भाजप गट क्रमांक दोन आणि त्याच पध्दतीने काँग्रेस गट क्रमांक एक, काँग्रेस गट क्रमांक दोन अर्थात मुनगंटीवार, जोरगेवार, वडेट्टीवार व धानोरकर अशी दोन पक्षांची चार गटात विभागणी झालेली आहे. ‘मला वरचं आहे… तो माझ्या खाली आहे’ आणि ‘सत्ता, गट, मान-सन्मान यांच्या भांडणात विकास कुठेच नाही; जनतेचा विचार कुणालाच नाही’ अशा आशयाच्या घोषवाक्यांमधून सध्याच्या राजकीय वातावरणावर टीका करण्यात आली आहे.

विकास हवा, राजकारण नको

पोस्टरमध्ये शहरातील मूलभूत नागरी समस्यांनाही अधोरेखित करण्यात आले आहे. पाणीटंचाई, स्वच्छतेचा अभाव, बंद पडलेली किंवा अपुरी प्रकाश व्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था यांसारखे प्रश्न अजूनही कायम असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘आम्हाला हवा विकास… नको हे राजकारण’ आणि ‘जनतेचा एकच सवाल – विकास कधी करणार, की असंच भांडत राहणार?’ असे प्रश्नही त्यात उपस्थित करण्यात आले आहेत.

समाजमाध्यमावर पोस्टरची चर्चा

गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या रद्द झालेल्या बैठकीवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील दोन गटांमध्ये उघड संघर्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आयुक्तांच्या दालनातील आंदोलन, महापौरांविरोधातील घोषणाबाजी आणि नगरसेवकांमधील धक्काबुक्की यामुळे महापालिकेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमावर या पोस्टरची चर्चा अधिक रंगली आहे. तसेच काँग्रेस पक्षात गटनेते पदावरून आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात जोरदार भांडण सुरू आहे. गटनेते पदाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने स्वीकृत नगरसेवक हा विषय प्रलंबित आहे. तसेच काँग्रेसचे १६ नगरसेवक पर्यटनात व्यस्त असल्याने प्रभागातील समस्या जैसे थे आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधात प्रभागात पोस्टर लावण्यात आलेले आहेत.

…ही तर महापालिकेची जबाबदारी

शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, राजकीय मतभेद असू शकतात; मात्र त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ नये. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि इतर नागरी प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. सत्तासंघर्षात विकासकामे मागे पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, या पोस्टरची जबाबदारी कोणत्या संघटना किंवा व्यक्तीने घेतलेली नसली, तरी त्यामधील आशयामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महापालिकेतील गटबाजी बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा आता नागरिकांकडून अधिक ठामपणे व्यक्त होत आहे.