चंद्रपूर :महापालिकेची सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्याच्या निर्णयानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष शुक्रवारी उघडपणे चव्हाट्यावर आला. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवक महापालिका कार्यालयातच आमनेसामने आल्याने जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. काही काळ महापालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
भाजप विरुद्ध भाजप
शुक्रवारी दुपारी होणारी सर्वसाधारण सभा गुरुवारीच महापौर संगीता खांडेकर यांनी रद्द केली. काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीशी संबंधित एका विषयावर स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाला आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला. “नेमक्या कोणत्या कायदेशीर तरतुदीच्या आधारे संपूर्ण सभा रद्द करण्यात आली?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी आयुक्त अनुकुरी नरेश यांच्या दालनात घेराव करीत ठिय्या आंदोलन सुरू केले. नगरसचिवांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानंतर आंदोलक नगरसेवक महापौरांच्या दालनासमोर पोहोचले आणि स्वपक्षीय महापौरांविरोधात घोषणाबाजी केली. काही नगरसेवकांनी भजन मंडळीसह अनोखे आंदोलन करत निषेध नोंदविला.
मुनगंटीवार व जोरगेवार समर्थकात धक्काबुकी
दरम्यान, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार समर्थक नगरसेवक महापालिका कार्यालयात दाखल होताच दोन्ही गट समोरासमोर आले. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर काही क्षणांत धक्काबुक्कीत झाले. दोन्ही बाजूंचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने परिसरात गोंधळ उडाला. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
भाजप मध्ये तीव्र गटबाजी
या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्ष उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीपासून सुरू झालेला वाद आता दोन प्रभावी गटांतील प्रतिष्ठेच्या लढाईत परिवर्तित झाल्याचे चित्र दिसत आहे.
‘एकाच विषयावर स्थगिती; मग संपूर्ण सभा का रद्द?’
भाजप गटनेते शेखर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आयुक्तांना निवेदन देत संपूर्ण सभा रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. न्यायालयाने केवळ अजेंड्यातील एका विषयावर स्थगिती दिली असून इतर सर्व विषयांवर चर्चा होऊ शकत होती, असे त्यांनी स्पष्ट केले. शेट्टी यांनी सांगितले की, महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार एकदा बोलावलेली सभा अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलता येते; मात्र ती संपूर्ण रद्द करण्याची तरतूद नाही. त्यामुळे हा निर्णय लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणारा असून शहराच्या विकासाच्या दृष्टीनेही घातक असल्याचा आरोप त्यांनी केला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरील अनेक महत्त्वाचे विषय या सभेत चर्चेसाठी होते. एका विषयावरील न्यायालयीन स्थगितीचे कारण देत संपूर्ण सभा रद्द करणे म्हणजे शहराच्या जनहितालाच डावलणे असल्याची टीका त्यांनी केली.
गटनेता हटविण्याची मागणी
दरम्यान, महापालिकेतील सभागृह नेत्या जयश्री जुमडे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन गटनेते शेखर शेट्टी यांना पदावरून हटविण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकारानंतर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व या संघर्षावर काय भूमिका घेते आणि शिस्तभंगाची कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
