चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेतील सहा स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांच्या निवडीवर अखेर न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. काँग्रेसमधील गटनेतेपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यातील विषय क्र. २२ वर स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया तूर्तास रखडली असून या घडामोडीमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

खासदार धानोरकर समर्थकांचा विरोध

चंद्रपूर महापालिकेची बहुप्रतीक्षित सर्वसाधारण सभा ३ जुलै रोजी दुपारी १ वाजता राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अजेंड्यातील विषय क्र. २२ अंतर्गत सहा स्वीकृत सदस्यांची निवड होणार असल्याने इच्छुकांनी विविध राजकीय पक्षांकडे लॉबिंग सुरू केले होते. मात्र काँग्रेसमधील गटनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ट असताना हा विषय सभेपुढे आणल्याबाबत धानोरकर समर्थक नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला होता.महापालिकेतील विद्यमान संख्याबळानुसार काँग्रेसला तीन, भाजपला दोन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला एक स्वीकृत सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे. संबंधित पक्षांच्या गटनेत्यांकडून स्वीकृत सदस्यांची नावे सादर केली जाणार होती. मात्र काँग्रेसमध्ये गटनेतेपदावरून निर्माण झालेला वाद अद्याप निकाली न लागल्याने स्वीकृत सदस्यांच्या निवडीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

काँग्रेसचे तत्कालीन गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवून नगरसेवक सुरेंद्र अडबाले यांना नवे गटनेते म्हणून विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली होती. मात्र या निर्णयाला राजेश अडूर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली.

स्वीकृत सदस्य निवडीला स्थगिती

त्यामुळे सध्या गटनेतेपदाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून राजेश अडूर यांच्याकडेच गटनेतेपद कायम आहे.या पार्श्वभूमीवर धानोरकर समर्थक नगरसेवकांनी स्वीकृत सदस्य निवडीचा विषय सर्वसाधारण सभेत घेऊ नये, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र प्रशासनाने सभेच्या अजेंड्यात हा विषय कायम ठेवल्याने त्यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने याचिकेची दखल घेत अजेंड्यातील विषय क्र. २२ वर स्थगिती दिल्याने स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया तूर्तास थांबली आहे.

दरम्यान, काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार समर्थक आणि खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवक यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून दोन्ही गट आमनेसामने आले असून या वादाचा परिणाम आगामी महापालिका राजकारणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे आता महापालिकेसह इच्छुक उमेदवार आणि सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने स्वीकृत सदस्य विषय स्थगित केल्याने वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.