चंद्रपूर; शहरात गुरुवार २८ सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने विसर्जन स्थळी तयारी पूर्ण केली असुन इरई नदीवर होणाऱ्या विसर्जनासाठी पाण्याची पातळी चांगली राहावी यादृष्टीने ईरई धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. विसर्जनादरम्यान नदीपात्रामध्ये पुरेसे पाणी राहील याची खात्री करण्यात आली असल्याची माहीती मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी विसर्जन व्यवस्था पाहणी दरम्यान दिली.
विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी मनपा शहर नियंत्रण समितीद्वारे १५० अधिकारी कर्मचारी कार्यरत असुन यादृष्टीने विविध कार्ये केली गेली आहेत.विसर्जन स्थळावर विसर्जनासाठी ६ वेगवेगळ्या रॅम्पची व्यवस्था करण्यात असुन यामुळे गर्दी न होता विसर्जन करता येईल.४ फुट पर्यंतच्या मुर्तीसाठी वेगळी,६ फुट पर्यंतच्या मुर्तीसाठी,८ फुट पर्यंतच्या मुर्तीसाठी,१० फुट पर्यंतच्या मुर्तीसाठी वेगळी जागा व १० फुटवरील मुर्तींसाठी २ वेगवेगळ्या जागा तयार करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> गोंदिया: जीव मुठीत घेत पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास!
सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणुन बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे. यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय कार्यरत ठेवण्यात येणार आहे.मोठ्या मुर्तींच्या विसर्जनास अडथळा निर्माण होऊ नये म्हणुन दोन क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दहा फुटापेक्षा जास्त उंचीचे आणि जास्त वजनी मुर्तींसाठी क्रेनचा वापर केला जाणार आहे.
मार्गावरील आवश्यक त्या ठिकाणी झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागाद्वारे मिरवणुकीचे मार्गांवरील खड्डे भरून काढण्यात आले आहेत. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. विद्युत विभागामार्फत सर्व कृत्रिम तलाव, जटपुरा गेट, मुख्य मार्ग, विसर्जन मार्ग, विसर्जन स्थळ तसेच संपूर्ण शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था तसेच जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाच्या २ चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन गांधी चौक, जटपुरा गेट व विसर्जन स्थळी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> बुलढाणा : तहसील समोर ढोल खंजेरी वादनासह काँग्रेसचा रात्रभर जागर, सरकारला जागे करण्यासाठी ठिय्या
जटपुरा गेट येथे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप व स्टेज उभारणी करण्यात येत असुन विसर्जन मार्गावर वॉच ठेवण्यास पोलीस प्रशासनासाठी तसेच मिरवणुक लाईव्ह दाखविण्यासाठी १४ मचान उभारण्यात आले आहेत. विसर्जन स्थळी मनपा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या बसण्यासाठी स्टेजची व्यवस्था करण्यात आली आहे.अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन मोठे सर्च लाईट, फिरे अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज, क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात २५ कृत्रिम कुंड व २२ निर्माल्य कलश उभारण्यात आले असुन यात ४४४८ तर फिरत्या विसर्जन कुंडांत १०५ असे एकुण ४५५३ घरघुती मुर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात आतापर्यंत केले गेले आहे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur municipal corporation completed preparations for ganesh immersion rsj 74 zws