चंद्रपूर : काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी महापालिका निवडणुकीत माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नंदू नागरकर व प्रशांत दानव यांना उमेदवारी नाकारली. दोघांनीही बंडखोरी करीत अपक्ष म्हणून शड्डू ठोकला आणि जिंकलेही. आता महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला ३४ या बहुमताच्या आकड्यासाठी त्यांच्या समर्थनाची आवश्यकता आहे. त्यामुळे धानोरकर व वडेट्टीवार यांच्यावर नागरकर व दानव यांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी दिल्लीवारी करणाऱ्या नागरकर, दानव, सुनिता लोढीया, विणा खनके, सकिना अंन्सारी यांच्यासह नऊ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले. यातील नागरकर, दानव व लोढीया या तिघांना तर अखेरच्या क्षणापर्यंत ‘एबी फाॅर्म’साठी ताटकळत ठेवले आणि शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारण्यात आली. अखेर या तिघांनी बंडखोरी करित निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. नागरकर, दानव, लोढिया यांच्या पराभवासाठी खासदार धानोरकर यांनी आर्थिक बळ देण्यापासून तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या सभा, बैठका येथे आग्रहास्तव लावल्या. दोघांचीही काँग्रेसमधून तडकाफडकी हकालपट्टी केली. मात्र, नागरकर आणि दानव यांचा पराभव घडवून आणण्यात त्यांना अपयश आले.
महापालिका निवडणुकीत नागरकर यांनी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष लहामगे यांचा, तर दानव यांनी अपक्ष शुभम शास्त्रकार यांचा पराभव केला. काँग्रेसचे २७, जनविकास सेनेचे तीन, बसप आणि एमआयएम प्रत्येकी एक, असे काँग्रेसकडे ३२ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. बहुमतासाठी ३४ नगरसेवकांचे पाठबळ आवश्यक आहे. नागरकर आणि दानव यांच्या मदतीशिवाय काँग्रेसचा महापौर होणे अशक्य आहे. यामुळे काँग्रेस नेते नागरकर आणि दानव यांच्याशी संपर्क साधत आहेत. झाले गेले विसरून जा आणि काँग्रेसमध्ये परत या, अशी गळ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या दोन्ही नगरसेवकांना घातली. सोबतच वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्याकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरकर व दानव हे दोघेही माळी समाजातून येतात. माळी समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. मात्र, आता संपूर्ण माळी समाजही काँग्रेस नेत्यांच्या अशा कृत्यावर नाराज आहे. दरम्यान, नागरकर व दानव यांनी शिवसेना उबाठा व वंचित बहुतन आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना, वंचित व अपक्ष, अशा दहा नगरसेवकांचा गट महापौर, उपमहापौर निवडणुकीत निर्णायक भूमिकेत आहे.
भ्रमणध्वनी बंद, काँग्रेसला ‘अल्टिमेटम’
काँग्रेसच्या २७ नगरसेवकांचा गट स्थापन होताच शिवसेना उबाठा, वंचित व अपक्ष अशा १० नगरसेवकांचा गट सतर्क झाला आहे. या सर्वांचे भ्रमणध्वनी शुक्रवारी रात्री १० वाजतापासून बंद आहेत. सर्व १० नगरसेवकांकडून वाटाघाटी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, या वाटाघाटी भाजप नेत्यांसोबत आहेत, की काँग्रेस नेत्यांसोबत, हे अद्याप उघडकीस आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या १० नगरसेवकांनी ठाकरेसेनेचा महापौर करा, यासंदर्भात ८ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा आम्ही भाजपसोबत जाण्यास मोकळे असणार, असा ‘अल्टिमेटम’ काँग्रेस नेत्यांना दिला होता, अशी माहिती आहे.

