चंद्रपूर: प्रदेश काँग्रेसने महापालिका निवडणुकीतील पराभूतांची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती करू नये, असा आदेश दिल्याने अनेकांची अडचण झाली आहे. स्वीकृत सदस्य होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या आशेवर या निर्णयामुळे पाणी फेरले आहे. चंद्रपूर महापालिकेत मित्रपक्षांसह काँग्रेसला ३० जागा मिळाल्या. तरीही महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर स्वीकृत सदस्यत्वासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले. काँग्रेसला संख्येच्या बळावर तीन स्वीकृत सदस्यपद मिळणार आहे. जनविकास सेनेचे प्रदीप देशमुख यांचे तीन नगरसेवक आहेत. काँग्रेससोबत आघाडीत निवडणूक लढणारे देशमुख यांनी जनविकास सेनेच्या चार नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे.
त्यांनी जनविकास सेनेकडून एकाला स्वीकृत सदस्यपदी संधी द्यावी, असा आग्रह धरला तर काँग्रेसची अडचण होणार आहे. देशमुख यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे आग्रह करूनच उपमहापौरपदाच्या निवडणुकीत स्वत:चा अर्ज कायम ठेवला होता. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक वसंता देशमुख यांना उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती. आता काँग्रेसकडे देशमुख यांनी स्वीकृत सदस्यपदाचा आग्रह धरला, तर अडचण वाढण्याची शक्यता आहे. विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार गटाकडून रामू तिवारी, धानोरकर यांच्याकडून संतोष लहामगे यांची नावे चर्चेत आहेत.
वन्यजीव अभ्यासक तथा काँग्रेस कार्यकर्ते बंडू धोतरे यांनाही निवडणुकीपूर्वी स्वीकृत सदस्यपदाचे गाजर दाखविण्यात आले होते. प्रदेश काँग्रेसने निवडणुकीत पराभूत झालेल्यांना स्वीकृत सदस्य करू नये, असा आदेश काढल्याने अनेकांची अडचण झाली आहे. पक्षनिहाय सदस्यसंख्या पाहता काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि उबाठा-वंचितचा एक सदस्य स्वीकृत म्हणून महापालिकेत जाईल, अशी शक्यता आहे. दरम्यान स्थायी समितीत नावे पाठविण्यासाठी ५ मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांची भेट घेत आहे. जटपूरा प्रभागातून निवडुन आलेल्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाची बैठक नुकतीच काँग्रेसच्या समर्थनावर निवडून आलेल्या स्थानिक पक्षाच्या गटनेत्यासोबत झाली. त्यामुळे ही बैठकही चर्चेचा विषय ठरली आहे.
काँग्रेस नगरसेवक वसंता देशमुख नाराज
उपमहापौरपदाच्या निवणुकीतून ऐनवेळी माघार घेण्यास भाग पाडल्याने काँग्रेस नगरसेवक वसंता देशमुख तीव्र नाराज आहेत. पक्षाच्याच काही नगरसेवकांजवळ देशमुख यांनी ही नाराजी बोलून दाखविली. काँग्रेसकडून देशमुख यांना स्थायी समिती सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र तसे झाले नाही तर, महापालिकेत नवे राजकीय समीकरण तयार होईल, अशीही चर्चा आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वसंता देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, तेव्हापासून या नव्या समीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे जोरगेवार समर्थक माजी नगरसेवक रवी गुरनुले यांनीही नगरसेवक वसंता देशमुख यांची भेट घेतली. त्यामुळे आता देशमुख यांची नाराजी काँग्रेस नेते कसे दूर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
