चंद्रपूर: महापालिका निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल देत काँग्रेस – जनविकास आघाडीचे ३० नगरसेवक निवडून दिले. मात्र खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार संख्याबळ जुळवण्याऐवजी सलग २५ दिवस महापौर व गटनेता पदासाठी आपसात भांडत राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या हातची सत्ता भाजपकडे गेली. या घाणेरड्या राजकारणामुळे चंद्रपुरातील मतदार व काँग्रेसचे कार्यकर्ते खासदार धानोरकर व वडेट्टीवार यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. त्याचा परिणाम समाज माध्यमावर वडेट्टीवार व धानोरकर या दोघांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यातल्या त्यात खासदार धानोरकर यांच्यावर तर समाज माध्यमात सडकून टीका होत आहे.
महापालिकेत काँग्रेसचे २७ , जानविकास सेनेचे ३, बसप १ असे ३१ संख्याबळ होते. बहुमतासाठी काँग्रेसला फक्त तीन मतांची आवश्यकता होती. वडेट्टीवार – धानोरकर भांडणात महापौर पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय नेतृत्वाने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर सोपविली होती. मात्र धानोरकर मागील २५ दिवसात ३१ चे ३२ नगरसेवक करू शकल्या नाही. स्वत: खासदार एक नगरसेवक जोडू न शकल्याने त्याचा परिणाम काँग्रेसच्या पराभवात झाला.
या पराभवामुळे काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांसोबतच प्रामाणिक कार्यकर्ता देखील प्रचंड दुखावला गेला आहे. याच दुःखातून आणि अस्वस्थतेतून काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या मतदारांनी समाज माध्यमावर खासदार धानोरकर व आमदार वडेट्टीवार यांच्यावर टीकांचा प्रचंड पाऊस पाडला आहे. या दोन नेत्यांनीच स्वतःच्या इगो साठी काँग्रेस नगरसेवकांना वेठीस धरले. तेव्हा या दोन्ही नेत्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून खासदारकी व आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
एका पदाधिकाऱ्याने तर नेते स्वतःला पक्षाचे मालक समजतात आणि कार्यकर्त्यांना नौकर समजत असल्यामुळे पक्षाची ही अवस्था झाली आहे अशी टीका केली. एका कार्यकर्त्यांने तर काँग्रेस नेत्यांनीच काँग्रेस कार्यकर्त्यांवर बलात्कार केला या भाषेत संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते बापू धोटे यांनी काँग्रेसला मतदान करणाऱ्या नेत्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी खासदार धानोरकर यांची आहे तेव्हा त्यांनीच राजीनामा द्यावा असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस नेत्यांनी जनतेचा सन्मान केला नाही या शब्दात अनेकांनी मत व्यक्त करित यापुढे काँग्रेस पक्षाला मतदान करू नये, खासदार यांनी पक्ष स्वत:च्या मालकी हक्काचा समजल्यामुळेच ही गती झाली आहे अशाही शब्दात अनेक जण व्यक्त होत आहेत.
खासदार धानोरकर यांच्या व्यक्तीगत अहंकारामुळे, गुंडागर्दीमुळे, तसेच निष्ठावंतांची तिकीट कापल्यामुळे भविष्यातही हा पक्ष खड्ड्यात जाईल या भाषेड संताप व्यक्त केला आहे. समाज माध्यमावर सध्या धानोरकर यांच्यावर टिकेची झोड उठली असून या टिकेला उत्तर देण्यासाठी धानोरकर समर्थकांकडूनही वेगवेगळे व्हीडीओ तयार करून भावनिक उत्तर दिले जात आहे.

