चंद्रपूर: साडेसात वर्षापूर्वी २०१४ च्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करणाऱ्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकत भाजपातून आयात माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याचे आणि महापालिकेत काँग्रेस जिवंत ठेवणाऱ्या काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार समर्थक काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष विद्यमान नगरसेवक नंदू नागरकर, प्रशांत दानव, प्रविण पडवेकर, सुनिता लोढीया, विना खनके, सकीना अंन्सारी यांची तिकीट कापण्यात आल्याने काँग्रेस पक्षाला ही निवडणूक जिंकायची आहे की पराभूत व्हायचे आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान काँग्रेसच्या तिकीट वाटपात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे एकतर्फी वर्चस्व राहिले आहे. तर वडेट्टीवार यांना समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात अपयश आले आहे. काँग्रेस पक्षातील या गोंधळाने कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.

मागील दोन दिवसांपासून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या बैठका अपक्ष आमदार सुधाकर अडबाले यांंच्या निवासस्थानी सुरू होत्या. सोमवारी मध्यरात्री सर्व १७ प्रभागातील ६६ उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली. या यादीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अतिशय पध्दतशीरपणे आमदार विजय वडेट्टीवार समर्थक उमेदवारांचा पत्ता कट केला. २०१७ ची महापालिका निवडणुक सर्वाधिक मतांनी विजयी झालेले माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांना महाकाली प्रभागातून उमेदवारी नाकारण्यात आली. तर प्रशांत दानव यांना विठ्ठी मंदिर, सुनिता लोढीया यांना वडगाव, प्रवीण पडवेकर, विना खनके व सकीना अंसारी यांना एकोरी प्रभागातून उमेदवारी नाकारण्यात आली.

विशेष म्हणजे बंडखोरी होवू नये म्हणून या सर्वांनाच शेवटच्या क्षणापर्यंत एबी फार्म दहा मिनिटात पाठवितो, अर्धा तासात पाठवितो असे फोन केले गेले. शेवटी नेत्यांनी हात झटकत उमेदवारी देवू शकत नाही असे सांगितले. दरम्यान या सर्वांना बंडखोरी करित उमेदवारी दाखल केल्याने या सर्वच प्रभागात काँग्रेसला फटका बसणार आहे. दरम्यान २०१४ च्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करणाऱ्या संतोष लहामगे पासून सर्व ११ जणांना उमेदवारी देण्याचे कौशल्य खासदार धानोरकर यांनी यावेळी दाखविले. दरम्यान समर्थकांची उमेदवारी कापतांना वडेट्टीवार एक शब्दही बोलले नाही. उलट घरी येवून झोपून गेले. काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही असे लक्षात येताच नंदू नागरकर, प्रविण पडवेकर वडेट्टीवार यांना भेटायला घरी गेले असता झोपून आहेत असा निरोप स्वीयसहायकाच्या माध्यमातून पाठविण्यात आला. समर्थकाची उमेदवारी कापल्यानंतर नेता झोपलेला असेल तर असा नेता काय कामाचा अशी प्रतिक्रिया आता कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत.

दरम्यान काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश न घेता भाजपचे माजी नगरसेवक राहुल घोटेकर यांना एकोरी प्रभागातून उमेदवारी दिली गेली. तसेच सातत्याने पराभूत होणाऱ्या काही उमेदवारांनाही काँग्रेस पक्षाने तिकीट दिली आहे. तर वडगाव प्रभागात पप्पू देशमुख यांच्या जनविकास सेनेसोबत आघाडी करतांना देशमुख यांना तीन तिकीटा दिल्या. तर काँग्रेसने सलग पाच वेळा नगरसेवक राहिलेल्या सुनिता लोढीया यांची तिकीट कापली. असाच प्रकार काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रशांत दानव यांच्यासोबतही केला. निष्ठावंतांची उमेदवारी कापून भाजपला मदत करणाऱ्यांना उघड तिकीटा देण्यात आल्याने काँग्रेस नेत्यांची भाजपसोबत छुपी युती झाली आहे अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान ज्यांची तिकीट कापण्यात आली ते सर्व वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची तिकीट द्यावी म्हणून वडेट्टीवारांच्या आग्रहास्तव दिल्लीत ठाण मांडून बसले होते. मात्र आता समर्थकांना उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा वडेट्टीवार घरी झोपून होते. नेते व कार्यकर्त्यात हाच फरक आहे अशीही टीका आता सर्व स्तरातून होत आहे.