Chandrapur Municipal Corporation suspension : चंद्रपूर: महापालिकेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनी आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक तथा अधिकारी यांना फेटे बांधले नाही या कारणास्तव महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युद्धीष्टर रैंच, भांडार प्रमुख सिद्धिकी अहमद या दोघांना तर याच दिवशी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी कार्यालय वेळेत उघडले नाही आणि दारू पिऊन असल्याच्या कारणाने महापौर व उपमहापौर यांच्या कक्षावरील दोन शिपाई अशा चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र दिन १ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गिरणार चौकातील अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामासाठी चबुतऱ्याच्या भूमिपूजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ.अशोक ऊईके, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिरे तथा सर्वपक्षाचे नगरसेवक तसेच जिल्हाधिकारी पंत, आयुक्त अकनुरी नरेश यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या सर्वांना कार्यक्रम स्थळी फेटे बांधले नाही तसेच कार्यक्रमस्थळी बॅनर लावले नाही.

कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करण्यात आल्या नाही, अशा सबबीखाली जनसंपर्क अधिकारी युधिष्ठर रैंच, भंडारपाल सिद्धिकी अहमद सिद्धिकी अहमद यांना निलंबित करण्यात आले आहे. तर १ मे रोजी महापालिकेत महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव हे ध्वजारोहणासाठी आले असता शिपायांनी सकाळी कार्यालय उघडले नव्हते. ते दोघेही दारू पिवून असल्याचे लक्षात आले. त्यामुळे खांडेकर यांच्या कार्यालयातील शिपाई जेजीलवार आणि उपमहापौरांच्या कार्यालयाचे शिपाई बोते यांचे निलंबन करण्यात आले आहे. या चौघांच्याही निलंबनाचा आदेश ४ मे रोजी काढण्यात आला.

दरम्यान, आयुक्त अकुनुरी नरेश यांनी जनसंपर्क अधिकारी युधिष्ठर रैंच आणि भांडारप्रमुख सिद्धिकी अहमद यांच्यावर आकसपूर्ण कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. निलंबनाचा आदेश मिळाल्यानंतर युधिष्ठर रैंच आणि सिद्धिकी अहमद या दोघांनी आपले म्हणणे लेखी कळविले. मात्र, या दोघांच्याही लेखी उत्तरावर आयुक्तांचे समाधान झाले नसल्याचे दिसत आहे. चार जणांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात झालेल्या राणी हिराई महोत्सवात देखील राजशिष्टाचाराचे पालन केले नाही असा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्यानंतर सहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आयुक्त अकनुरी नरेश आकसपूर्ण कारवाई करीत असल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आयुक्त उपयुक्त, सहायक आयुक्त किंवा झोन चे सहायक आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याऐवजी लहान कर्मचाऱ्यांना लक्ष करीत असल्याने कर्मचारी नाराज आहेत.