चंद्रपूर : महापालिकेची तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेली सर्वसाधारण सभा बुधवारी (५ ऑगस्ट) अखेर मोठ्या गदारोळात पार पडली. स्वीकृत सदस्यांच्या मुद्द्यावरून आमसभा तहकूब करण्यासाठी कोरम अपूर्ण ठेवण्याची रणनीती भाजप आमदार किशोर जोरगेवार व काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवकांनी आखली होती. मात्र, महापौर संगीता खांडेकर यांनी आवश्यक कोरम २२ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह पूर्ण झाल्यानंतर तत्काळ कामकाज सुरू करून विषयपत्रिकेवरील तीन विषय मंजूर केले आणि सभा समाप्त झाल्याची घोषणा करत सभागृहातून बाहेर पडल्या. त्यामुळे विरोधकांचा सभा तहकूब करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आमसभेसाठी आवश्यक संख्याबळ होऊ नये यासाठी प्रयत्न
गेल्या दोन महिन्यांपासून विविध कारणांनी सर्वसाधारण सभा पुढे ढकलली जात होती. अखेर बुधवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता सभा बोलाविण्यात आली होती. मात्र, सभेपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला होता. आमसभेसाठी आवश्यक २२ नगरसेवकांच्या संख्येचा कोरम पूर्ण होऊ नये किंवा कोरम पूर्ण झाल्यास गोंधळ घालून सभा तहकूब करण्याची रणनिती खासदार धानोरकर व आमदार जोरगेवार समर्थक नगरसेवकांसह जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांनी आखली होती. महापालिकेत सर्व नगरसेवक उपस्थित झाल्यानंतरही आमसभेची वेळ उलटून गेल्यानंतरही अनेक नगरसेवक सभागृहात नव्हते. आमदार जोरगेवार व खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवक आपापल्या कक्षात थांबून होते.
नगरसेविका संजीवनी वासेकर यांच्यामुळे कोरम पूर्ण
दुसरीकडे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, विधीमंळ नेते विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवक, अपक्ष नंदू नागरकर आणि शिवसेना उठाबाच्या किरण कोतपल्लीवार यांच्यासह सुमारे २० नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे सभा तहकूब होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याच दरम्यान महापौर संगीता खांडेकर सभागृहात दाखल झाल्या. काही क्षणांतच वडेट्टीवार समर्थक नगरसेविका संजीवनी वासेकर सभागृहात पोहोचल्याने आवश्यक २२ सदस्यांचा कोरम पूर्ण झाला.
तीन विषय मंजूर
कोरम पूर्ण होताच महापौरांनी तातडीने सभेचे कामकाज सुरू केले. त्यांनी ३० एप्रिल रोजीच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर केले. त्यानंतर ११ मे रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त आणि ९ एप्रिल रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त माहितीस्तव सभेपुढे ठेवण्यात आले. हे तिन्ही विषय मंजूर झाल्याचे महापौरांनी घोषित केले.
विरोधकांचा गोंधळ
दरम्यान, कोरम पूर्ण झाल्याची माहिती मिळताच खासदार धानोरकर, आमदार जोरगेवार समर्थक नगरसेवक तसेच जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख हे सभागृहात धावत आले. त्यांनी महापौरांच्या समोर एकत्र येत सभा तहकूब करण्याची मागणी केली. यावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. महापौर संगीता खांडेकर यांनी विरोधी सदस्यांना शांततेचे आवाहन करत विषयपत्रिकेवर शहरातील विकासकामांशी संबंधित महत्त्वाचे विषय असल्याचे सांगितले. विकासकामांचे विषय निकाली काढल्यानंतर स्वीकृत सदस्यांच्या प्रश्नावर स्वतंत्रपणे अर्धा तास चर्चा करण्याची तयारीही दर्शविली. मात्र, त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. या गोंधळादरम्यान जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी नगरसचिव संतोष गर्गेलवार यांच्या हातातील महापालिका अधिनियमाचे पुस्तक हिसकावून घेत माईक फेकून दिला. त्याचवेळी भाजपचे नगरसेवक सुभाष कोसनगोट्टूवार, काँग्रेस गटनेते सुरेंद्र अडबाले आणि भाजप गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनीही सभा तहकूब करण्याची मागणी करत गदारोळ घातला. विरोधी सदस्यांचा गोंधळ सुरू असतानाच महापौरांनी सभा समाप्त झाल्याची घोषणा केली आणि सभागृहातून बाहेर पडल्या. त्यामुळे विरोधकांचा नियोजित डाव फसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या संपूर्ण घडामोडीत भाजप आमदार जोरगेवार समर्थक नगरसेवकांनीही स्वपक्षीय महापौरांविरोधात भूमिका घेतल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी गटातील वाढता अंतर्गत संघर्ष या घटनेतून स्पष्टपणे समोर आला आहे. स्वपक्षीय महिला महापौरांनाच जोरगेवार समर्थक भाजप नगरसेवक काम करू देत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्वाक्षऱ्यांवर खोडतोड झाल्याचा आरोप
आमसभेला उपस्थित २५ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या ठराव पुस्तिकेवर आहेत. त्यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक तीन नगरसेवकांच्याही स्वाक्षऱ्या आहे. मात्र, या स्वाक्षऱ्यांची नोंद झाल्यानंतर संबंधित तीन स्वाक्षऱ्यांवर खोडतोड करण्यात आली आहे. या प्रकाराची नोंद महापालिका आयुक्तांनी घेतली असून प्रकरणाची पडताळणी करण्यात येणार आहे.
विरोध करणाऱ्यांसोबत बसले
महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच आजच्या आमसभेच्या वेळी उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी महापौरांच्या बाजूला बसण्याऐवजी खाली विरोध करणाऱ्यांसोबत बसलेले होते. त्यांचा विरोध हा महापौर निवडणुकीतील आश्वासनांची पूर्ती अद्याप झालेली नाही असा होता अशी माहिती सूत्रांनी दिली.
