चंद्रपूर: बहुमताचा आकडा ३४ चा आणि अवघे २४ नगरसेवक हाताशी असतांना महापौर पदाची निवडणूक जिंकणे हा तसे बघितले तर एक चमत्कार आहे. मात्र हा चमत्कार माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात करून दाखविला आहे. मुख्यमंंत्री, प्रदेशाध्यक्षांकडून महापौर पदाची उमेदवारी समर्थक संगीता खांडेकर हिला मिळवून देण्यापासून तर शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांच्या मागील २५ दिवसांपासून दिवसरात्र संपर्कात राहून महापौर पदाचा सव्वा सव्वा वर्षाचा लेखी करार करून चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्यात मुनगंटीवार यांना यश आले. त्यामुळेच या निवडणुकीत खऱ्या अर्थाने सुधीर मुनगंटीवार ‘किंगमेकर’ ठरले आहेत.
महापालिका निवडणुक जाहीर झाली तेव्हापासूनच भाजपमध्ये मुनगंटीवार व जोरगेवार गटबाजी उफाळून समोर आली. मुनगंटीवार समर्थक १७ उमेदवारांचे एबी फार्म चोरण्यापासून तर अनेक समर्थकांची उमेदवारी कापण्यापर्यंत गटबाजीचे राजकारण झाले. त्याचा परिणाम भाजपचे केवळ २३ नगरसेवक निवडून आले. मित्र पक्ष शिवसेना शिंदे पक्षाचा केवळ एक नगरसेवक जिंकून आला. भाजप व मित्र पक्षाकडे २४ संख्याबळ होते आणि महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जिंकायला ३४ संख्याबळ आवश्यक. काँग्रेसला ३२ वरून संख्याबळ ३४ वर नेणे अधिक सोपे, त्या तुलनेत भाजपला २४ वरून संख्याबळ ३४ वर नेणे अशक्यच होते. मात्र मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे महापौर पदाची जबाबदारी माझ्याकडे सोपवा, मी चंद्रपूर पालिकेत भाजपचा महापौर बसविणारच असा आग्रह धरला. पक्षानेही गटनेता आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटाकडे सोपविला. तर महापौर पदासाठी मुनगंटीवार यांच्या कट्टर समर्थक संगीता खांडेकर यांचे नाव निश्चित केले.
प्रदेशाध्यक्षांनी महापौर पदाच्या उमेदवार संगीता खांंडेकर आहेत असे पत्रही पाठविले.मात्र त्यानंतरही आमदार जोरगेवार यांनी त्यांच्या गटाच्या नगरसेविका ॲड.सरिता संदुरकर हिचा अर्ज महापौर पदासाठी दाखल केला. त्यावरून बरेच राजकारण झाल्यानंतर जोरगेवार यांनी ॲड.संदुरकर यांनी उमेदवारी मागे घेतली. याच दरम्यान मुनगंटीवार संख्याबळ जुळविण्यासाठी रात्रदिवस कामाला लागले. शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे, अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर, प्रशांत दानव यांच्याशी सतत संपर्कात होते. विशेष म्हणजे दररोज राजकीय चित्र तासा तासाला बदलत होते. मात्र ८ आणि ९ फेब्रुवारीच्या रात्री मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाला सव्वा सव्वा वर्ष महापौर पद भाजप व शिवसेना विभागून घेण्याचा तसेच पाच वर्षा उपमहापौर पद ठाकरे सेना स्वत:कडे ठेवणार आणि स्थायी समिती दोन वर्ष सभापती पद घेणार असा प्रस्ताव दिला.
भाजपने सेनेला प्रस्ताव दिल्याचे माहिती होताच काँग्रेस कडूनही सेनेला प्रस्ताव दिला गेला. मात्र काँग्रेस अर्थात खासदार प्रतिभा धानोरकर सेनेला कुठल्याही स्थितीत महापौर पद देण्यास तयार नव्हती. कारण दिल्लीतील हायकमांडकडून खासदार धानोरकर यांनी काँग्रेससाठी नाही तर केवळ स्वत:च्या गटासाठी महापौर पद आणले होते. त्यामुळे धानोरकर यांचा महापौर पदासाठीच आग्रह होता. मुनगंटीवार यांनी नेमका हाच धागा पकडला आणि ९ फेब्रुवारीला पून्हा सव्वा सव्वा वर्ष महापौर पदाचा प्रस्ताव शिवसेनेचे गिऱ्हे यांना दिला.
दरम्यान याच वेळी मुनगंटीवार जबलपूर येथे कौटूंबिक विवाहसोहळ्यासाठी निघून गेले. दरम्यान याच वेळी मुनगंटीवार समर्थक खांडेकर महापौर पदी विराजमान होवू नये यासाठी भाजपमधील गट एक सक्रीय झाला होता. भाजप सेना युती होवू नये यासाठी या गटाने प्रयत्न् सुरू केले होते. मात्र मुनगंटीवार विवाह सोहळ्यात असले तरी गिऱ्हे व नागरकर यांच्याशी फोनवर सतत संपर्क कायम ठेवला. धानोरकर महापौर पद सोडायला तयार नसल्याने शेवटी गिऱ्हे यांनी मुनगंटीवार यांचा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर मुनगंटीवार समर्थक ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी उपमहापौर राहुल पावडे ५०० रूपयांचा स्टॅम्प पेपर घेवून गिऱ्हे यांच्याकडे पाठविले. मुनगंटीवारांचे दूत शर्मा व पावडे यांनी स्टॅप् पेपरवर सव्वा सव्वा वर्ष महापौर पद भाजप व शिवसेना विभागून घेण्याचा करार केला.
भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा व शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांच्यात स्टॅम्प पेपर वर लेखी करार झालेला आहे. या करारावर शर्मा व गिऱ्हे या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. या करारावर भाजपकडून राहुल पावडे तर शिवसेनेकडूनही एक सहकारी साक्षीदार आहे. महापौर निवडणुकीच्या अवघ्या काही तास अगोदर हा लेखी करार एका वाहनात बसून करण्यात आला. महापौर पदासाठी आवश्यक संख्याबळ नसतांना मुनगंटीवार यांनी जबलपुरात बसून चंद्रपुरात भाजपचा महापौर बसविण्याचा चमत्कार घडवून आणला आहे. त्यामुळे मुनगंटीवारच खऱ्या अर्थाने किंगमेकर असल्याची चर्चा चंद्रपुरच्या राजकारणात सुरू आहे. मुनगंटीवार यांनी महापौर पदी त्यांची कट्टर समर्थक खांडेकर हिला बसवून पक्षातील विरोधकांवर तसेच खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार यांनाही मात दिली आहे.
