चंद्रपूर : महापौर, गटनेतेपदावरून काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात सुरू असलेला वाद आणि गटबाजीसमोर दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठीही तलबल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या ‘हायव्होल्टेज’ बैठकीत महापौर धानोरकर गटाचा, तर गटनेता वडेट्टीवार गटाचा, असे सूत्र ठरले. मात्र, यानंतर खासदार मुकुल वासनिक यांनी हस्तक्षेप केला. त्यावरून संख्याबळ अधिक असलेल्या नेत्याला सत्तास्थापनेचे सर्वाधिकार बहाल करावे, याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तर निरीक्षक म्हणून सुनील केदार यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २७ नगरसेवक आहेत. मित्र पक्षांचे मिळून काँग्रेसकडे ३० नगरसेवक होतात. सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला आणखी चार नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात महापौर व गटनेतेपदावरून चढाओढ सुरू आहे. या वादावर तोडगा काढण्यात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अपयश आल्याने हा प्रश्न दिल्लीदरबारी राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे गेला.
धानोरकर व वडेट्टीवार गटाने मंगळवारी रात्री दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. वेणुगोपाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत धानोरकर गटाचा महापौर, तर वडेट्टीवार गटाचा गटनेता करण्याचे सूत्र ठरले. मात्र, संख्याबळ अधिक असल्याने महापौरपद वडेट्टीवार गटाचा करावा, अशी आग्रही मागणी पुढे आली.
पक्षश्रेष्ठींनी तोडगा काढल्यानंतरही बुधवारी सकाळी दिल्लीत निवडक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार वासनिक यांनी या वादात हस्तक्षेप केल्याचे सांगितले जात आहे. राजकीय वर्तुळात सध्या महापौर धानोरकर गटाचा, तर गटनेता वडेट्टीवार गटाचा, उपमहापौर व स्थायी समिती सभापती मित्रपक्षांना देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वासनिक यांच्या हस्तक्षेपानंतर संख्याबळ अधिक असलेल्या नेत्याकडे सत्तास्थापनेची सूत्रे सोपवण्यात यावी, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्याचेही बोलले जात आहे.
वडेट्टीवार यांच्याकडेच सर्व सूत्रे!
काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी मित्र पक्ष आणि अपक्षांची गरज आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि बंडखोर अपक्ष नगरसेवकांची वडेट्टीवार यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. धानोरकर यांच्यासोबत चर्चेसाठी गिऱ्हे व अपक्ष नगरसेवक तयार नाहीत. त्यामुळेच काँग्रेसश्रेष्ठींकडे वडेट्टीवार यांना सर्व सूत्रे सोपवण्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही नेत्यांमधील गटबाजीसमोर काँग्रेसश्रेष्ठीदेखील हतबल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, धानोरकर वणी येथील शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांच्या माध्यमातून थेट वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचेही प्रयत्न सुरूच
भाजप आणि शिवसेना उबाठा पक्ष सव्वा-सव्वा वर्षे महापौरपद विभागून सत्तास्थापन करणार, अशी चर्चा सुरू आहे. महापौरपद मिळत असले तर शिवसेना जिल्हाप्रमुख गिऱ्हे भाजपसोबत जायला तयार आहेत. मात्र, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, भाजपसोबत जायचे नाही, असे स्पष्ट निर्देश दिल्याने गिऱ्हे यांची अडचण झाली आहे. भाजपचे २४ नगरसेवक असून सत्तास्थापनेसाठी आणखी दहा नगरसेवकांची आवश्यकता आहे. काँग्रेसचा एक गट भाजप नेत्यांच्या संपर्कात असला तरी शिवसेना व बंडखोर अपक्ष नगरसेवकांशिवाय भाजपसमोर दुसरा पर्याय नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
नगरसेवकांच्या पर्यटन, देवदर्शनावर लाखोंचा खर्च
नगरसेवकांच्या पर्यटन आणि देवदर्शनावर काँग्रेस व भाजप नेत्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. नवनिर्वाचित ६६ पैकी बहुतेक नगरसेवक मागील पंधरवड्यात चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, पेंच, अकोला, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये खासगी वाहनांनी तसेच विमानांद्वारे गेले होते. हा प्रवास तसेच हॉटेल, खाणपाण, सुरक्षा रक्षक, खरेदी, आदींवर लाखोंचा खर्च झाला. या खर्चामुळे नेतेही वैतागले असल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी आपापल्या गटातील नगरसेवकांना पर्यटन, देवदर्शनासाठी पाठवले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्याही गटाचे नगरसेवक पर्यटन आणि देवदर्शनाला गेले होते. शिवसेना, वंचित, अपक्ष, बसप नगरसेवकही पर्यटनावर आहेत. नगरसेवक सोडून जावू नये, यासाठी नेत्यांकडून लाखोंचा खर्च केला जात आहे. मात्र, या उधळपट्टीला आता नेतेही वैतागले आहेत. मात्र, राजकारणात स्वत:ची शक्ती सिद्ध करण्यासाठीच हे नेते तारेवरची कसरत करत असल्याचे दिसते आहे.
३६ नामनिर्देशन पत्रांची उचल
महापौर व उपमहापौर निवडीसाठी नागपूर विभागीय आयुक्त यांनी निश्चित केल्याप्रमाणे महापालिकेच्या निर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा १० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राणी हिराई सभागृहात होऊ घातली आहे. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी ३६ नामनिर्देशनपत्राची उचल झाली आहे. यात भाजप १८, काँग्रेस १०, भारतीय शेतकरी कामगार पक्ष ४, तर अपक्षांनी ४ अर्जांची उचल केली. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा गुरुवार शेवटचा दिवस आहे.

