चंद्रपूर: महापालिका स्थायी समिती सभापदीपदी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या मनस्वी संदीप गिऱ्हे यांची ईश्वरचिठ्ठीने निवड झाली. त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक वसंता देशमुख यांचा पराभव केला. दरम्यान गिऱ्हे यांच्या विजयामुळे पालिकेत आता महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अशी तिन्ही पदे सत्ताधारी भाजप व शिवसेना ठाकरे युती कडे आली आहेत.
महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक राज्यात गाजली होती. त्यामुळे स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना उठाबा पक्षाकडून नगरसेविका मनस्वी गिऱ्हे आणि काँग्रेसचे वसंता देशमुख अशा दोन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र होते. त्यामुळे गिऱ्हे व देशमुख यांच्यात सरळ लढत होती.
एकूण सोळा सदस्य असलेल्या स्थायी समितीत सत्ताधारी भाजप – शिवसेना आणि विरोधी काँग्रेसचे व जनविकास सेना युतीचे प्रत्येकी आठ सदस्य होते. यातही भाजपचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांचे अनुक्रमे दोन व चार सदस्य होते. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत काय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे शिवसेनेच्या मनस्वी गिऱ्हे यांनाच मतदान करा या आशयाचे पत्र आल्यानंतर हालचाली सुरू झाल्या आणि भाजपचे सर्व सदस्य एकत्र आले.
त्यामुळे निवडणूक ईश्वरचिठ्ठीने निवड होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. परंतु जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांनी रस्ता दुभाजक व महापालिकेतील आजवरच्या गैरव्यवहाराची चौकशी लावण्याचे लेखी आश्वासन काँग्रेसचे वसंता देशमुख देत असेल तरच त्यांना मतदान करू , अशी भूमिका घेतली होती. परंतु विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दोन्ही देशमुखांचा समेट घडवून आणला.
सोमवारी दुपारी एक वाजता स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली. यावेळी हात उंच करून मतदान घेण्यात आले. यात गिऱ्हे व देशमुख यांना प्रत्येकी आठ मते मिळाली. त्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांकडून ईश्वर चिठ्ठी काढली असता मनस्वी गिऱ्हे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यानी कामकाज बघितले.यावेळी आयुक्त अकुनुरी नरेश उपस्थित होते. मनस्वी गिऱ्हे विजयी झाल्याची घोषणा होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. मनस्वी गिऱ्हे या प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत आणि सभापती झाल्या आहेत. मनस्वी गिऱ्हे यांचे पती संदिप गिऱ्हे चंद्रपूर जिल्हा शिवसेना प्रमुख आहेत.
देशमुखांच्या पाठिशी ‘ईश्वर’ नाही
उपमहापौर व स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक ईश्वरचिठ्ठीने झाली. उपमहापौर पदासाठी काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे प्रदीप उर्फ पप्पू देशमुख व स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेसचे वसंता देशमुख उमेदवार होते. मात्र या दोन्ही निवडणूकीत ईश्वरचिठ्ठीने देशमुख यांना साथ दिली नाही. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत प्रशांत दानव तर सभापती पदासाठी मनस्वी गिऱ्हे यांची ईश्वरचिठ्ठी निघाल्याने आता राजकीय वर्तुळात देशमुखांच्या पाठिशी ईश्वर नाही अशी चर्चा रंगली आहे.
