चंद्रपूर: महापौर पदावरून भाजपमध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशाेर जोरगेवार यांच्यात सुरू असलेल्या शीतयुध्दावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तोडगा काढला आहे. मुनगंटीवार गटाच्या संगीता खांडेकर महापौर पदाच्या उमेदवार आहेत, तर उपमहापौर पदाचे उमेदवार जोरगेवार गटाचे संजय कंचर्लावार आहेत. दरम्यान ३४ हा बहुमताच्या आकड्यासाठी भाजपला बरीच कसरत करावी लागणार आहे.
महापालिका निवडणुकपूर्व आणि निवडणुक काळात भाजपमध्ये मुनगंटीवार व जोरगेवार गटात एकमेकांवर कुरघाडी करण्याचे राजकारण झाले. त्याचाच परिणाम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहिर केलेल्या यादीतील १७ उमेदवारांची नावे बदलण्यात आली. त्यानंतर एकमेकांचे उमेदवार पाडापाडीचे राजकारणही जोरात झाले. त्याचा परिणाम भाजपचे केवळ २३ नगरसेवक निवडून आले. सध्या भाजपकडे २४ नगरसेवक आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपला ३४ संख्याबळ हवे आहे. आणखी दहा नगरसेवकांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे.
महापौर पदाच्या उमेदवार मुनगंटीवार गटाच्या संगीता खांडेकर आहेत. त्यामुळे आणखी दहा नगरसेवकांची जुळवाजुळव मुनगंटीवार यांनाच करावी लागणार आहे. मुनगंटीवार यांच्याकडून काँग्रेसचा एक गट संपर्कात असल्याचे सांगितले जात असले तरी आणि वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात टोकाची भांडणे असली तरी संख्याबळाच्या जवळ असल्याने काँग्रेस फुटणार ही शक्यता कमी आहे. अशा स्थितीत मुनगंटीवार यांना शिवसेना उद्धव ठाकरे, वंचित आणि अपक्ष या १० नगरसेवकांना सोबत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे मुनगंटीवार या १० नगरसेवकांना कसे आपलेसे करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
परभणी महापालिका निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी आहे. परभणी येथील निवडणुकीनंतरच चंद्रपूरचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी मुनगंटीवार यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे मुनगंटीवार काय राजकीय खेळी खेळतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. उपमहापौर पदासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक संजय कंचर्लावार आहेत. मुनगंटीवार व जोरगेवार या निवडणुकीसाठी तरी एकत्र येतात का याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे.

