चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील कोरंबी गावाने गुरुवारी अक्षरशः मृत्यूला डोळ्यांत डोळे घालून पाहिले. पहाटेच्या शांततेत अचानक एका बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याने संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले. काही क्षणांसाठी गावकऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. मात्र, वनविभागाच्या तत्परतेमुळे आणि सुमारे चार तास चाललेल्या संयमी बचाव मोहिमेमुळे बिबट्याला कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.

घरात आश्रय

गुरुवारी (२ जुलै) पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास नागभीडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील कोरंबी गावातील एका गोठ्यात हा बिबट्या शिरला. त्याचवेळी गावातील रहिवासी विद्याधर नन्नावरे हे लघुशंकेसाठी घराबाहेर आले असता, त्यांची नजर समोर उभ्या असलेल्या बिबट्यावर पडली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आरडाओरडा केला. लोकांचा आवाज ऐकताच घाबरलेल्या बिबट्याने थेट शेजारील महादेव नन्नावरे यांच्या घरात आश्रय घेतला.बिबट्या घरात घुसल्याची वार्ता काही क्षणांतच गावभर पसरली. महिलांनी आणि लहान मुलांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली, तर ग्रामस्थांनी घटनास्थळापासून दूर राहून सावध भूमिका घेतली. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

चार तासाचे थरारक अभियान

घटनेची माहिती मिळताच नागभीडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर येथून विशेष प्रशिक्षित ट्रॅक्विलायझर (भूल) पथकाला पाचारण करण्यात आले. वनाधिकारी, कर्मचारी आणि तज्ज्ञांच्या समन्वयातून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बचाव मोहीम राबविण्यात आली. सुमारे चार तास चाललेल्या या थरारक मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन पकडण्यात वनविभागाला यश आले. संपूर्ण कारवाईदरम्यान ना बिबट्याला इजा झाली, ना कोणत्याही नागरिकाला दुखापत झाली. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सतर्क राहण्याचे आवाहन

कोरंबी गावात बिबट्या थेट घरात घुसण्याची ही पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि मानव–वन्यप्राणी संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने नागरिकांना रात्री व पहाटेच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात बिबट्या किंवा अन्य वन्यप्राणी आढळल्यास घाबरून गोंधळ न घालता अथवा स्वतः कारवाई करण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.

वनाच्या सीमारेषा ओलांडून मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचणाऱ्या वन्यजीवांच्या वाढत्या हालचाली ही केवळ एक घटना नसून, बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीची गंभीर सूचना असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.