चंद्रपूर : मागील तीन वर्षापासून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी नगरसेवकांना २०२५ या वर्षात जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका व नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे संकेत दिले आहेत. मात्र निवडणुका कधी होतील हा प्रश्न सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे. भाजपाने स्थानिक पातळीवर बुथ व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने जबाबदारी संबंधित प्रभागाच्या प्रमुखांकडे सोपविली तर कॉग्रेसने देखील ग्रामीण व शहरी भागात जिल्हा परिषद, महापालिका व नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तर सत्कार सोहळ्यात जिल्ह्यातील सर्व नगर पालिका जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला आहे. कॉग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनीही पक्ष त्या दिशेने तयारीला लागला आहे अशी माहिती माध्यमांशी बोलतांना दिली. काही माजी नगरसेवक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य तर मागील तीन वर्षापासून सातत्याने तयारी करित आहेत. मात्र निवडणुका लागत नसल्याने या सर्वांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

हे ही वाचा… नागपूर महापालिकेकडून कर वसुलीसाठी दंड माफी, काय आहे योजना?

विशेष म्हणजे भाजप व कॉग्रेस या दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महायुती व महाविकास आघाडीतून निवडणुक लढण्यासऐवजी पक्षाने स्वतंत्र निवडणुक लढवावी अशीच इच्छा बोलून दाखविली आहे.

माजी नगरसेवकांचा प्रताप

स्थानिक महापालिकेत भाजपाची सत्ता होती. आता पालिकेत प्रशासक आहेत. तेव्हा भूमिपूजन व उद्घाटन प्रशासकांच्या हस्ते होणार हे क्रमप्राप्त आहे. मात्र काही माजी नगरसेवक व माजी नगरसेविका पालिकेत प्रशासकांना विश्वासात न घेता स्वत:च सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, भूमिगत नालीचे बांधकाम याचे भूमिपूजन, लोकार्पण करित आहेत. प्रामुख्याने भाजपाच्या माजी नगरसेवकांकडून हा प्रकार होतांना येथे बघायला मिळत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur people representative now waiting for elelction of zilla parishad and municipal corporations rsj 74 asj