चंद्रपूर : महापालिकेत सत्तास्थापनेवरून काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. नगरसेवकांच्या पळवापळवीनंतर आता नगरसेवकांची बस रस्त्यात अडवून अपहरणाचा प्रयत्न, हाणामारी, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत हा वाद पोहोचला आहे. याप्रकरणी वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस ठाण्यात धानोरकर गटाचे सौरभ ठोंबरे तथा अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धानोरकर यांचे कट्टर समर्थक सोहेल शेख यांचेही नाव पोलीस तक्रारीत आले आहे. सोहेल शेख व ठोंबरे महापालिका निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार आहेत.

चंद्रपूर महापालिकेत महापौर तथा गटनेता हा आपल्याच गटाचा व्हावा, यावरून वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात निवडणूक निकालापासूनच वाद सुरू आहे. काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील १४ वडेट्टीवार, तर १३ धानोरकर यांचे समर्थक आहेत. धानोरकर गटातील चार ते पाच नगरसेवक वडेट्टीवार गटात सहभागी झाले आहेत. मात्र, यातील तीन नगरसेवक वडेट्टीवार गटाने पळवून नेल्याचा धानोरकर गटाचा आरोप आहे.

वडेट्टीवार गटाचे सर्व नगरसेवक पुणे येथे सहकुटुंब पर्यटनाला गेले होते. नगरसेवक राजेश अडूर, त्याची पत्नी अश्विनी राजेश अडूर, नगरसेवक सचिन कत्याल, नगरसेवक वसंता देशमुख, करिष्मा जंगल, सोफिया खान, अब्दुल करीम शेख तथा इतर नगरसेवक गुरुवारी पहाटे समृद्धी महामार्गाने नागपूर येथे खासगी बसने परत येत असताना पाच ते सहा वाहनांनी त्यांची वाट रोखली. या वाहनांतील ठोंबरे आणि त्यांचे १० ते १५ सहकारी ट्रॅव्हल्सजवळ आले आणि ‘सोबत चला, सोहेलभाई इनसे बात कर लो,’ असे वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांना बजावले.

अडूर तथा सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला असता, ‘तुम्हा सर्वांना जीवानिशी ठार मारू, अशी धमकी त्यांनी दिली. दरम्यान, नगरसेवकांनी आरडाओरड करताच ठोंबरे व त्याचे सहकारी पळून गेले. दरम्यान, अडूर यांनी कॉनैन शमीम सिद्दीकी (२१) याला पकडले. त्याने नागपुरातील मुजम्मील खान, जासीम खान, आलोक रोहीदास, अदनान शेख व सौरभ ठोंबरे त्याच्यासोबत होते, असे सांगितले. याप्रकरणी ठोंबरे व इतर चार, अशा एकूण पाच जणांविरुद्ध सावंगी मेघे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर नगरसेवकांची बस नागपूरजवळ आली असताना आणखी काही गुंडांनी ती अडवली. त्यांनी नगरसेवकांना शिवीगाळ केली. तसेच मारहाण केल्याचीही माहिती आहे. एकंदरीत, काँग्रेसमधील वडेट्टीवार व धानोरकर गटांतील वाद आता नगरसेवकांना जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ आणि अपहरण करण्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकाराची काँग्रेसश्रेष्ठींनी वेळीच दखल घ्यावी, अन्यथा एखाद्याचा जीव जाईल, अशी भीती नगरसेवकांमधून व्यक्त होत आहे.