चंद्रपूर: राजुरा शहरातील कुल्फी व्यवसायिक राजू गराडी (४०) यांनी पंधरा दिवसांपूर्वी स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान चार दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृत्यूपूर्वीचा एक चित्रफीत (व्हिडिओ) समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक झाला असून त्यामध्ये त्यांनी एका महिलेसह राजकीय पक्षाचे पुढारी आणि पोलिसांवर मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप केल्याने राजुरा शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू गराडी हे राजुरा शहरातील गडचांदूर मार्गावर मागील अनेक वर्षांपासून कुल्फी व्यवसाय करीत होते. काही महिन्यांपासून ते मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. समाज माध्यमावरील सार्वत्रिक झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी एका महिलेवर विनाकारण आरोप लावून त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला शिवाय एका स्थानिक पुढाऱ्याने दुकान बंद करण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा उल्लेखही त्यांनी व्हायरल व्हिडिओ मध्ये केला आहे.
याशिवाय घरातून आपली मोटारसायकल चोरीला गेल्यानंतरही पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही, उलट कोणताही गुन्हा नसताना पोलिसांकडून वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना दोनदा पत्र दिले, मात्र न्याय मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.“खोटे आरोप आणि मानसिक छळामुळे जीवन जगण्याचा अर्थ उरला नाही,” असे म्हणत त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याचे व्हिडिओमध्ये नमूद केले आहे. मात्र उपचारादरम्यान चार दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर समाज माध्यमावर संबंधित व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मृत्यूपूर्वी राजू गराडी यांनी काही व्यक्तींची नावे घेतल्याने आता पोलिस या प्रकरणात कोणती भूमिका घेतात आणि पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
