चंद्रपूर : वर्धा नदीच्या किनारी धानोरा, भोयेगाव पुलाजवळ महाराष्ट्रात प्रथमच बायसन, हरिण, डुक्कर आणि मानवी अल्प जीवाश्मे तसेच सोबत पाषाण युगीन अवजारे सापडली आहेत. ही शेवटच्या हिमयुगीन, प्लेइस्टोसीन काळातील २०,००० वर्षे दरम्यानची अतिशय नवीन प्राण्यांची जीवाश्मे असल्याची महत्त्वाची माहिती प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
संशोधित प्राणी
आजपर्यंत भूशास्त्र विभागालासुद्धा अशी जीवाश्मे महाराष्ट्रात आढळली नव्हती, ती प्रा. सुरेश चोपणे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात शोधून काढली आहेत. नदीजवळ आढळलेल्या प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात बायसनचे जीवाश्म आढळले. कमी प्रमाणात वाइल्ड बोअरचे दात, हरिणाचे हाड, मानवाच्या पाषाण युगीन अवजारांसोबत काही मानवाची आणि प्राण्यांची हाडे मिळाली असून ती सुरेश चोपणे रॉक म्युझियममध्ये सुरक्षित ठेवली आहेत.
पाषाण युगीन मानव आणि वन्यजीवांचा संबंध
पाषाण युगीन मानवांची अवजारेसुद्धा अलीकडील प्राण्यांच्या जवळच आढळली असून, मानव त्यांची शिकार करीत होते हे सिद्ध होते. २०,००० वर्षांदरम्यान जगात हिमयुग होते, त्यानंतर ते तापमानामुळे वितळले आणि प्रचंड महापूर आला. ह्याच महापुरात विदर्भ आणि चंद्रपूरमधील सर्व प्राणी नदीत वाहून गेले आणि गाळात गाडले गेले. काही हजार वर्षांनंतर त्यांचे जीवाश्मात रूपांतर झाले. वर्धा नदीच्या वरोरा आणि चंद्रपूर तालुक्यातच काही ठिकाणी नदीत वाहून आलेला गाळ, रेती आणि दगड आढळतात आणि याच ठिकाणी प्रा. सुरेश चोपणे यांना हत्ती आणि इतर प्राण्यांची जीवाश्मे सापडली आहेत. भूशास्त्र विभागालाही अजून अशी जीवाश्मे चंद्रपूर जिल्ह्यात आढळली नाहीत.
चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्राण्यांची जीवाश्मे
चंद्रपूर जिल्हा हा भूशास्त्र आणि जीवाश्मांच्या बाबतीत देशात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक महत्त्वाचा जिल्हा असून, तो भूशास्त्रीय संग्रहालय मानला जातो. येथे प्रा. चोपणे यांनी महत्त्वाची जीवाश्मे शोधली असून त्यात २०० कोटी ते २०,००० वर्षांपर्यंतची जीवाश्मे आढळतात. यामध्ये १५० कोटी वर्षांपूर्वीचे स्ट्रोमॅटोलाइट, २० कोटी वर्षांचे वृक्ष आणि पानांचे जीवाश्म, ६ कोटी वर्षांचे डायनासोर, वृक्ष, शंख-शिंपले आणि अगदी अलीकडील २०,००० वर्षांचे हत्तीचे जीवाश्म यांचा समावेश आहे.
प्रा. सुरेश चोपणे यांची विविध संशोधने
प्रा. सुरेश चोपणे हे १९९५ पासून भूशास्त्रीय संशोधन करीत आहेत. चार वर्षांपूर्वी चंद्रपूर आणि वणी येथे पृथ्वीवरील १५० कोटी वर्षांपूर्वीचे पहिले स्ट्रोमॅटोलाइट जीवाश्म त्यांनी शोधून काढले. २५ वर्षांपूर्वी ६ कोटी वर्षांचे डायनासोर, शंख-शिंपले, १५ कोटी वर्षांदरम्यानचे वृक्ष आणि पाने त्यांनी शोधून काढली. तसेच शंख-शिंपले आणि विविध जीवाश्म स्थळांचाही शोध त्यांनी लावला आहे.
