चंद्रपूर: ब्रिटीशकालीन वास्तुकलेचा दुर्मीळ ठेवा असलेल्या चंद्रपूर येथील १०४ वर्षे जुन्या ऐतिहासिक ‘सराई बिल्डिंग’ला महाराष्ट्र सरकारने अखेर संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. या निर्णयामुळे प्रस्तावित पाडकामाला पूर्णविराम मिळाला असून, ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
चंद्रपूरमधील नागरिक तथा इतिहास अभ्यासक अशोक जयराज सिंह आणि एम.आय.डी.सी. असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगटा यांनी सराई इमारतीच्या संवर्धनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका (पीआयएल क्रमांक २५/२०२२) दाखल केली होती. या प्रकरणात अॅड. अमोल मर्दीकर आणि अॅड. रत्ना सिंह यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून या निर्णयाची माहिती देण्यात आली. सरकारने १५ एप्रिल २०२५ रोजी संरक्षित स्मारक घोषित करण्याबाबतची इरादा अधिसूचना काढली होती. त्यानंतर २२ मे २०२६ रोजी महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अंतर्गत अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली.
रेल्वे स्टेशन रोडवरील सराई वॉर्डमधील गट क्रमांक १६६३ येथे ही वास्तू आहे. सन १९२१ मध्ये ब्रिटिश राजवटीत उभारण्यात आलेली ही इमारत शतकभर प्रवाशांसाठी विश्रांतीगृह म्हणून वापरली जात होती. कमानीदार व्हरांडे, दगडी बांधकाम आणि वैशिष्ट्यपूर्ण वसाहतकालीन वास्तुशैली यामुळे ही इमारत विदर्भातील विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सार्वजनिक वास्तुकलेचा महत्त्वाचा नमुना मानली जाते.

चंद्रपूर महापालिकेने इमारत जीर्ण झाल्याचे कारण देत तिच्या पाडकामाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, याचिकाकर्त्यांनी ही वास्तू चंद्रपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत तिचे संवर्धन करण्याची मागणी केली होती.
संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यानंतर या वास्तूमध्ये कोणतेही बदल, पाडकाम, नवीन बांधकाम किंवा दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे वास्तूचे संवर्धन आणि पुनर्स्थापना आता वारसा संवर्धनाच्या नियमांनुसार केली जाणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाचे चंद्रपूरमधील नागरिक आणि वारसाप्रेमींनी स्वागत केले आहे. “सराई इमारत केवळ विटा-दगडांची वास्तू नाही; ती चंद्रपूरच्या इतिहासाची आणि स्मृतीची साक्ष आहे,” अशी भावना याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारच्या अंतिम अधिसूचनेची नोंद घेत उच्च न्यायालयाकडून संबंधित जनहित याचिका निकाली काढली जाण्याची शक्यता आहे.
