चंद्रपूर : सावली तालुक्यातील व्याहाड–सोनापूर मार्गावर गुरुवारी रानटी हत्तीच्या हल्ल्यात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या काही आठवड्यांपासून परिसरात मुक्तपणे वावरत असलेल्या हत्तींच्या कळपाने प्रथमच मानवी बळी घेतल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, व्याहाड येथील रहिवासी अतुल गोहने हे दुचाकीने सोनापूरच्या दिशेने जात होते. व्याहाड–सोनापूर मार्गावर अचानक त्यांच्या समोर रानटी हत्ती आला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी दुचाकी रस्त्यावरच सोडून जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, बिथरलेल्या हत्तीने त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात अतुल गोहने यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला. वनविभागाने हल्ल्याची कारणमीमांसा करण्यासह संबंधित परिसरात हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

सावली वनपरिक्षेत्रात गेल्या काही काळापासून रानटी हत्तींचा वावर वाढला असून, अनेक गावांतील शेतजमिनी, पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, या घटनेत प्रथमच मानवी जीव गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वनविभागाने हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, वनविभागाने नागरिकांना हत्तींच्या वावराच्या परिसरात विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. सकाळी लवकर किंवा रात्री जंगलालगतच्या मार्गांवरून प्रवास टाळावा, तसेच रानटी हत्ती दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, बिबट्यानंतर आता रानटी हत्तींचाही वाढता वावर आणि त्यातून निर्माण होणारा मानव–वन्यप्राणी संघर्ष हा गंभीर प्रश्न बनत असून, या संघर्षावर दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजनांची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.