चंद्रपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून होणाऱ्या रोख रकमेच्या पुरवठ्यात सातत्याने खंड पडत असल्याने ५०० च्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) बहुतांश ‘एटीएम’मध्ये ठणठणाट आहे. १ व २ तारखेला शासकीय कर्मचारी, पगारदार, पेन्शनधारक मोठ्या प्रमाणात पैसे काढत असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असावी, असे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भारतीय स्टेट बँक ही जिल्हा तसेच शहरातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. तसेच बँकेने ठिकठिकाणी ‘एटीएम’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, शहरातील रामनगर, वरोरा नाका, मूल मार्गावरील बहुतांश ‘एटीएम’मध्ये शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस पैसेच नव्हते, अशी तक्रार ग्राहकांनी केली. तसेच अनेकांनी ‘एटीएम’मध्ये ठणठणट असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या रामनगर, वरोरा नाका व नागपूर मार्गावरील ‘एटीएम’मध्ये जावून चौकशी केली असता दोन दिवस ही स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी दुपारपर्यंत अनेक ‘एटीएम’मध्ये ठणठणाट असल्याचे दिसून आले.
बँकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकेला नियमित रकमेचा पुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांमध्ये रोख रकमेचा पुरवठा करताना सातत्याने खंड पडत आहे. रोख रक्कम पाठवण्यात रिझर्व्ह बँकेकडून सातत्य राखले जात नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळेच बहुतांश ‘एटीएम’मध्ये रोख रकमेचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे, एटीएम सेवा ही बँकेने एका खासगी कंपनीकडे सोपवली आहे. त्यामुळेही ‘एटीएम’मध्ये नोटांचा तुटवडा निर्माण झाला असावा, असे सांगण्यात आले. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून रोख रकमेचा पुरवठा कमी होत असल्याने सध्या तरी ५०० च्या नोटांचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. ही स्थिती आणखी किती दिवस राहील, याबाबत स्पष्टता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘सुट्टीमुळे रोख जमा करण्यात आली नसावी’
शेतकरी बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढत असल्याने तसेच १ व २ तारखेला शासकीय कर्मचारी, पगारदार, सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणात पैसे काढत असतात. त्यामुळे शहरातील काही ‘एटीएम’मध्ये पैसे नसतील. रविवारी बँकेला सुट्टी असते. त्यामुळे ‘एटीएम’मध्ये रोख रक्कम जमा करण्यात आली नसावी. परिणामी ही स्थिती निर्माण झाली असावी. अन्यथा बँकेकडे पुरेशी रोख रक्कम आहे, असे चंद्रपूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेचे मुख्य व्यवस्थापक रवी बनसोड यांनी सांगितले.
बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या सर्वांनाच रोख रक्कम दिली जात आहे. त्यामुळे रोख रकमेचा तुटवडा किंवा ५०० च्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला, असे म्हणता येणार नाही. रिझर्व्ह बँकेकडून नियमित रोख रक्कम पाठविली जाते. ही रक्कम पाठविताना कधी मागे-पुढे होऊ शकते. – रवी बनसोड, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय, मुख्य शाखा, चंद्रपूर.
