चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात चार महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. घटनास्थळी लावण्यात आलेल्या लाईव्ह आणि स्टील कॅमेऱ्यांमध्ये वाघिणीचे कुटुंब कैद झाले असून, त्यांना बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन पकडण्याचा प्रस्ताव वन विभागाने तयार केला आहे.
गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या कवडूबाई दादाजी मोहुर्ले (४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (४६), संगीता संतोष चौधरी (३६) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (३३) या चार महिलांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर वन विभागाने तातडीने परिसरात शोधमोहीम सुरू केली. सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी सांगितले की, ज्या परिसरात घटना घडली त्या भागात वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांचा सातत्याने वावर आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर वाघिणीला तिच्या बछड्यांसह जेरबंद करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
वन विभागाने घटनास्थळी विशेष पथक तैनात केले असून बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देणारी प्रशिक्षित टीमही गुंजेवाही परिसरात दाखल झाली आहे. वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगल परिसरात पाच लाईव्ह कॅमेरे आणि २० स्टील कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये वाघिणीचा आणि तिच्या तीन बछड्यांचा वावर स्पष्टपणे दिसून आला असल्याची माहिती वन विभागाने दिली.
याशिवाय, घटनास्थळी चार नैसर्गिक पिंजरे लावण्यात आले असून वाघिणीला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जंगल परिसरात सतत गस्त घालत असून नागरिकांना जंगलात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सलग घडलेल्या घटनांमुळे गुंजेवाहीसह आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक ग्रामस्थांनी घराबाहेर पडणे टाळले असून तेंदूपत्ता संकलनाचे कामही ठप्प झाले आहे. वाघिणीला तातडीने जेरबंद करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
