चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळविले. पवनपार तलाव परिसरात विशेष पथकाने सापळा रचून वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध केले. या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असून गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या दहशत आणि भीतीच्या वातावरणात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान वाघिणीसाठी चार पिंजरे व २० कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. शनिवारी रात्री आठ ते नऊ वाजताच्या सुमारास वाघीण जेरबंद करण्यात आली असून गोरेवाडा पार्क येथे रवाना करण्यात आली अशी माहिती सिंदेवाहीच्या वन परिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला केला होता. या भीषण घटनेत चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. एकाच दिवशी झालेल्या सलग हल्ल्यांमुळे संपूर्ण सिंदेवाही तालुका हादरला होता. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही दिला होता. घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तातडीने विशेष पथकांची नियुक्ती केली.
नागपूर आणि चंद्रपूर येथील तज्ज्ञ अधिकाऱ्यांसह ट्रँक्युलायझर तज्ज्ञ, वनरक्षक आणि स्थानिक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. ड्रोन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे आणि पावलांचे ठसे यांच्या आधारे वाघिणीचा माग काढण्यात आला. सकाळी पवनपार तलावाजवळ वाघीण आढळून आल्यानंतर पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. योग्य संधी साधत तिला डार्ट गनद्वारे भूल देण्यात आली. काही वेळातच वाघीण बेशुद्ध झाल्यानंतर तिला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पुढील निर्णय वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाणार आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी जंगल परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची मागणी पुढे येत आहे. तेंदूपत्ता हंगामात जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेली वाघीण ‘टी-२’ या नावाने ओळखली जाते. ती अंदाजे १४ वर्षांची प्रौढ मादी असून ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही परिक्षेत्रातील गुंजेवाही राऊंड, पवनपार-१ बीट आणि कंपार्टमेंट क्रमांक २८२ परिसरात तिचा वावर होता.
या कारवाईदरम्यान उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक जे. अरविंद (आयएफएस) आणि सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोऱावार उपस्थित होत्या. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद बचाव पथकाचे प्रमुख डॉ. आर. एस. खोबरागडे यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. ते वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
विशेष पथकात शूटर अजय सी. मराठे, वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सयांकर, राऊंड अधिकारी मानकर व नितीन गडपायले यांच्यासह वनरक्षक पेंदाम, मडावी, धनविजय, जवाडे, चौधरी, टेकाम, किन्हेकर आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. अनेक तासांच्या शोधमोहीमेनंतर पथकाने पवनपार तलाव परिसरात वाघिणीचा माग काढला. त्यानंतर योग्य संधी साधत तिला डार्ट गनद्वारे भूल देण्यात आली.
