चंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव-रत्नापूर शेतशिवारात रविवारी सकाळच्या सुमारास एका थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका वाघिणीने प्रथम बैलाची शिकार केली, त्यानंतर दोन ते तीन मुलांवर हल्ला केला. त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक सज्जन पारेकर (४२) यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि अवघ्या एका तासाच्या अंतराने वाघीण मृतावस्थेत आढळल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान भर उन्हात वाघिण ५०० ते ६०० लोकांच्या गराड्यात सापडल्याने तिचा मृत्यु झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
नवरगांव येथील रहिवासी महेंद्र कामडी यांचे रत्नापूर शेतशिवारात शेत आहे. हे शेत मंगेश तोडफोडे यांनी ठेक्याने घेतले आहे. रविवार २६ एप्रिलच्या सकाळी ११:३० च्या सुमारास शेतकरी मंगेश तोडफोडे मक्याच्या शेतात गेले असता, त्यांना त्यांचा बैल मृतावस्थेत आढळला. बारकाईने पाहणी केली असता, त्या ठिकाणी एक पट्टेदार वाघीण आणि तिचे तीन बछडे दिसून आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासात तिथे ५०० ते ६०० लोकांची गर्दी झाली. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वाघिणीने तिथे असलेल्या काही मुलांवर हल्ला केला. भर उन्हात वाघिणीने किमान चार ते पाच वेळा हल्ला केला. यामध्ये वाघिण अक्षरश: थकलेली दिसत होती.
वाघिणीला ग्रामस्थांनी घेराव केल्याची माहिती मिळताच वनविभागाची स्थानिक चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. वाघिणीचा शोध घेत असताना, तिने गोसीखुर्द कालवा (नहर) पार करून रत्नापूर रस्त्यालगत असलेल्या दामोधर लोधे यांच्या शेताकडे कूच केली. यावेळी कर्तव्यावर असलेले नाचनभट्टीचे वनरक्षक सज्जन पारेकर यांच्यावर वाघिणीने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात पारेकर गंभीर जखमी झाले त्यात त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून उजव्या हाताचा अंगठा फॅक्चर झाला त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत, रत्नापूर शिवारातील एका धान पिकाच्या शेतात ही वाघीण मृतावस्थेत आढळून आली. एका बाजूला वाघिणीची दहशत आणि दुसरीकडे तिचा झालेला अचानक मृत्यू, तर तिसरीकडे तिच्या आईविना पोरक्या झालेल्या तिन बछड्याचा प्रश्न यामुळे वनविभागासमोर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून आईपासून बिछडलेल्या बछड्यांचा प्रश्न निर्माण झाला असून वाघिणीसोबत असलेले तीन बछडे सध्या कुठे आहेत, याबाबत वनविभागाला शोध घ्यावा लागणार आहे. वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तिला काही अंतर्गत इजा होती की अन्य काही कारण, याचा तपास आता वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.
शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या घटनेनंतर वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावर (सायकार), रत्नापूरचे वनरक्षक ओमप्रकाश चंहादे, नवरगावच्या वनरक्षक प्राजक्ता चौधरी, माधुरी सुरपाम, श्रीकृष्ण नागरे यांच्यासह वनकर्मचारी आणि सिंदेवाही पोलीस घटनास्थळी ठाण मांडून आहेत.
वनविभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत वाघीण अंदाजे ८ ते १० वर्षे वयाची असून तिचे सर्व अवयव सुस्थितीत आणि शाबूत आहेत. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून वाघिणीचा मृतदेह उच्चस्तरीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे पाठविला आहे. नवरगाव उपवनक्षेत्रात रत्नापूर शिवारात घडलेल्या घटनेत अनुचीत प्रकार होवू नये म्हणून पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला असून घटनास्थळी वनविभागाचे वनरक्षक सज्जन पारेकर जिवावर उदार होवून कर्तव्य पार पाडले तर घटनास्थळी चहांदे , सुरपाम , चौधरी , नागरे वनरक्षक घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
