चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून, शुक्रवारी एकाच दिवशी वाघांच्या हल्ल्यांच्या तीन घटना घडल्या. चिमूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर सिंदेवाही तालुक्यातील धुमणखेडा येथे वाघाच्या हल्ल्यात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला. या घटनांमुळे जिल्ह्यातील जंगलांलगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चिमूर उपक्षेत्रातील गदगाव नियतक्षेत्रात शुक्रवारी (३० ऑक्टोबर) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पहिली घटना घडली. सदाशिव चिरकटा खडसंग (५५, रा. गरडापार) हे शेताला लागून असलेल्या जंगल परिसरात शौचास गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. हा परिसर ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येतो.

दुसरीकडे, धुमणखेडा येथे वाघाच्या हल्ल्यात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. पत्रु रामाजी मेश्राम (रा. धुमणखेडा) असे मृताचे नाव आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. मेश्राम हे दुपारी दोनच्या सुमारास शेतातील धानपिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोध सुरू केला. शेतात त्यांचा चष्मा, काठी, चप्पल आणि रक्ताचे डाग आढळले. वनविभागाच्या पथकाने शोध घेतला असता प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ त्यांचा मृतदेह आढळला. वाघाने त्यांना फरफटत नेऊन ठार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी २४ ऑक्टोबरला पळसगाव येथे नानाजी कामडी, तर २५ ऑक्टोबरला भेंडाळा येथे अंगणवाडी सेविका प्रेमिला महाडोरे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांच्या सलग घडत असलेल्या घटनांमुळे जंगलालगतच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वाघांचा तातडीने बंदोबस्त करून जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

पोंभुर्ण्यात गुराखी गंभीर जखमी

पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरातही वाघाने एका गुराख्यावर हल्ला केला. राजेश्वर बिजा सिडाम (६०) हे नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगलात गेले होते. सातारा तुकूम येथील वनकक्ष क्रमांक ४३६ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तसेच गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी सिडाम यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.