चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध गुराख्याचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. सामदा गावातील हिरामण मार्कंडी साखरे (७५) यांच्यावर नागोबा देवस्थानाजवळील जंगलात वाघाने झडप घातली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र सामदा, उपक्षेत्र व्याहाड अंतर्गत संरक्षित वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक १५०१ मध्ये, नागोबा देवस्थानापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील जंगलात ही घटना घडली. हिरामण साखरे हे नेहमीप्रमाणे त्यांचे भाऊ श्रावण साखरे यांच्यासह गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते.

दुपारच्या सुमारास गुरे चारत असताना वाघाची डरकाळी ऐकू आल्यानंतर गुरे वळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने हिरामण साखरे यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सावली पोलिसांनीही घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. सावली वनपरिक्षेत्रात दिवसेंदिवस मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी याच नागोबा देवस्थान परिसरात टस्कर हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहणे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वाघाच्या हल्ल्यात आणखी एका व्यक्तीचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असताना शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या दहशतीत शेतात जावे लागत आहे. वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे मजूरही. शेतीकामासाठी पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वाढत्या वाघ, बिबट आणि हत्तींच्या हालचाली लक्षात घेऊन गस्त वाढविणे, संवेदनशील भागात कायमस्वरूपी पथके तैनात करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.