नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख उंचावत असून गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील २०० माणसांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर पाच महिन्यात १९ जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक मृत्यू हे तेंदुपत्ता आणि मोहफुलांच्या मोसमातील आहेत. दरवर्षी या मोसमात १० ते १५ माणसे मृत्युमुखी पडत असून वनखात्याचा नियोजनावर वन्यजीव अभ्यासकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

तेंदूपत्ताच्या मोसमात व्याघ्रबळीत वाढ

तेंदुपत्ताच्या मोसमात हजारो गावकरी पहाटेच्या सुमारास जंगलात प्रवेश करतात. मागील वर्षी याच मोसमात दहा ते बारा माणसे वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. मोहफुलांच्या मोसमातही हीच स्थिती आहे. त्यामागे मोठे अर्थकारण दडलेले आहे. सातत्याने या घटना घडत असताना कोट्यवधीची नुकसानभरपाई देऊन वनखाते मोकळे होत आहे. मात्र, गेल्या दोन दशकात खात्याला या संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा शोधता आला नाही. वाघांची संख्या वाढली असली तरीही त्याचबरोबर गावकऱ्यांची जंगलातील निर्भरता वाढली आहे. काही वर्षांपूर्वी याच संघर्षावर उपाययोजना शोधण्यासाठी एक तांत्रिक समिती गठीत करण्यात आली. या समितीने अभ्यास करुन त्याचा अहवाल सादर केला. त्याला अनेक वर्षे उलटून गेली, पण अजूनही या अहवालाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हा संघर्ष वाढत आहे.

मागील वर्षी एकाच दिवशी तीन महिलांचा बळी

मागील वर्षी याच जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात तीन महिला जागेवरच ठार झाल्या. तर एक महिला गंभीर जखमी झाली. या सर्व महिला सिंदेवाहीजवळील मेंढा माल येथील होत्या. यातील शुभांगी चौधरी व कांता चौधरी यांच्यात सासूसूनेचे नाते होते. तर रेखा शेंडे या त्याच गावातील रहिवासी होत्या. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच २२ मे रोजी वाघाच्या हल्ल्यात चार महिला जागीच ठार झाल्या. या घटनेने सारेच हादरले आहेत. हे मृत्यु रोखणे आता वनखात्यालाही अवघड जात असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. दरवर्षी तेंदू आणि मोहाच्या मोसमात गावकरी हजारोंच्या संख्येने जंगलात जातात हे ठाऊक असूनही नियोजनाचा मात्र अभाव आहे.

दरवर्षी वाघाच्या हल्ल्यात ५० माणसांचा बळी

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यातील माणसांच्या बळीचा आकडा काढला तर दरवर्षी ५० जण मृत्युमुखी पडत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख वाढला असताना निधीसाठी कायमच हा जिल्हा उपेक्षीत राहिला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच नाही तर एकूणच विदर्भात मानव-वन्यजीव संघर्षाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. वन्यप्राणी आणि जंगल संरक्षणासाठी काम करणाऱ्या प्राथमिक प्रतिसाद दल, विशेष व्याघ्र संरक्षण दल हे नऊ-नऊ महिने वेतनाविना काम करत आहेत. शेवटी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या फाउंडेशनमधून त्यांच्या वेतनाची व्यवस्था करावी लागत आहे.