चंद्रपूर:मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमाला वाघाने ठार केल्याची घटना आज रविवार ५ एप्रिल रोजी सकाळी नागभीड तालुक्यात घडली.अलीकडेच तळोधी येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज याच तालुक्यात वाघाने पुन्हा एकाचा जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे.

नागभीड वनपरिक्षेत्रातील उपवन क्षेत्र मिडंळा अंतर्गत नवेगाव(मिंथुर) येथील हरिदास महादेव कुबडे (५८) हे शनिवार ४ एप्रिल रोजी सकाळी मोहफुले गोळा करण्यासाठी शेताकडे गेले होते. मात्र संध्याकाळ होवूनही ते घरी परत आले नाही. त्यांना शोधण्यासाठी पुतण्या अक्षय कुबडे संध्याकाळी शेताकडे गेला असता त्याला दोन वाघ व दोन बछडे दिसले. यामुळे तो घाबरुन घरी परतला.

घटनेची माहिती वनविभाग व पोलीस विभागाता देण्यात आली असता रात्री नऊ वाजेपर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र हरिदास कुबडे यांचा शोध लागला नाही. आज रविवार ५ एप्रिल सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली असता त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.

घटनास्थळावर वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यानी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी नागभीड येथे पाठविला. नागरिकांनी जंगल परिसरात जाताना सावधानता बाळगावी असे आवाहन नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी केले आहे.

दहा दिवसापूर्वी तळोधी बाळापूरच्या जंगलात प्रमिला वाटगुरे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर सिंदेवाही तालुक्यातील जंगलात एका ८३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. तेव्हाच नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील संतप्त नागरिकांनी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू बघता वाघाचा बंदोबस्त करावा, पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा वाघाचे हल्ले वाढल्याने ग्रामस्थांमध्ये.भीतीचे वातावरण आहे.

२०२५ मध्ये ४९ बळी

मानव वन्यजीव संघर्ष या जिल्ह्यात अधिक तीव्र झालेला आहे. २०२५ मध्ये एका वर्षात ४९ नागरिकांना वाघ, बिबट्या तथा वन्यप्राणी हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. यावर्षीही संघर्ष जैसे थे आहे. प्रत्येक महिन्यात वाघाच्या हल्ल्यात चार ते पाच नागरिकांचा बळी जात आहे. तेव्हा वन विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी समोर आली आहे.