चंद्रपूर: मागील ४८ तासात वाघाच्या हल्ल्यात दोन महिला ठार झाल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात शुक्रवारी यमुनाबाई बाजीराव मडावी (८८) या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर शनिवारी सकाळी मूल तालुक्यात सुनीता शामराव भोयर हिच्या मृत्यूने गावात तणावाचे वातावरण आहे. मृतदेह उचलून देणार नाही असा इशारा ग्रामस्थानी दिल्याने पोलिस बंदोबत लावण्यात आला आहे.
मूल तालुक्यातील सोमनाथ येथील शेतशिवारात कापूस तोडायला गेलेल्या सुनीता शामराव भोयर या महिलेवर आज शनिवारी सकाळी ७.५० वाजता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला असता महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भयभीत महिलांनी आरडाओरडा करताच वाघ तिथून पळून गेला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थानी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्या शिवाय मृतदेह उचलून शवविच्छेदनासाठी पाठवू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. दरम्यान वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून उपस्थित नागरिकांनी चर्चा सुरू झाली आहे. यावेळी घटनास्थळी भाजपचे प्रभाकर भोयर आणि काँग्रेसचे पंकज पुल्लावार पोहोचले असून ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वनविभाग तात्पुरती मलमपट्टी करते आणि वेळ निभावून नेते मात्र वाघांचा बंदोबस्त करण्यात आवश्यक पावले उचलली जात नाहीत. परिणामी अशा घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे जनता नाराज असून आता या घटनेनंतर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. पोलिस व वनाधिकारी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील पद्मापूर नियतक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यमुनाबाई बाजीराव मडावी (८८) असे मृत महिलेचे नाव आहे. पद्मापूर येथील यमुनाबाई मडावी या गुरुवारी जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी घरी परत आल्या नाही. त्यामुळे कुटुंबीयाने वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने पद्मापूर वनक्षेत्रात शोधाशोध केली. तेव्हा वाघाच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. ही माहिती पोलिस विभागालाही देण्यात आली. वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नागरिकांनी जंगलात एकटे न जाण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
