चंद्रपूर: ‘टायगर कॅपिटल’ अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एकाचवेळी चार महिलांचा मृत्यू झाल्याने वाढत्या दहशतीमुळे तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय संकटात सापडला आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील हजारो शेतकरी, मजूर आणि बेरोजगार नागरिकांसाठी तेंदूपत्ता संकलन हा महत्त्वाचा वर्षभराची अर्थिक मिळकतीचा रोजगाराचा आधार असतो. मात्र, जंगल परिसरात वाढलेल्या वाघांच्या वावरामुळे यंदा तेंदूपत्ता संकलनाचे काम आता ठप्प पडले असून शेकडो गावांतील नागरिकांपुढे रोजगाराचा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह जिल्ह्यात सध्या २३२ हून अधिक वाघ असल्याची नोंद आहे. त्यापैकी चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि मध्यचांदा वनविभागांच्या बाहेरील जंगल परिसरातच १५० पेक्षा अधिक वाघांचे अधिवास असल्याचे वन विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यामध्ये चंद्रपूर वनविभागात ४२, मध्यचांदा वनविभागात ४० आणि ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक ६५ वाघ असल्याची माहिती आहे.
तेंदूपत्ता संकलन धोक्यात
विशेष म्हणजे, तेंदूपत्ता संकलन होणाऱ्या जंगल क्षेत्रातच वाघांचा सर्वाधिक वावर असल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील तेंदूपत्ता उद्योगातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. वन विभागाच्या चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि मध्यचांदा या तीन विभागांत तेंदूपत्ता संकलनासाठी एकूण ६६ युनिट आहेत. यामध्ये चंद्रपूर विभागात १८, ब्रह्मपुरी विभागात २७ आणि मध्यचांदा विभागात २१ युनिटचा समावेश आहे. एका युनिटअंतर्गत साधारणतः आठ ते दहा गावांतील नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो.
वन विभागाने सहाव्यांदा लिलाव प्रक्रिया राबविल्यानंतर ५६ युनिटची विक्री झाली असली तरी अनेक ठिकाणी अद्याप प्रत्यक्ष तेंदूपत्ता संकलन सुरू झालेले नाही. उर्वरित युनिटचा लिलावही पूर्ण झालेला नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेकडो गावांतील नागरिकांचा हंगामी रोजगार ठप्प झाला आहे.
वाघाची दहशत
दरम्यान, मागील वर्षभरात जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षातील जानेवारी ते मे या पाच महिन्यांतच १९ नागरिकांचा बळी गेला आहे. अलीकडेच सिंदेवाही परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर जंगलात जाण्याची भीती अधिक वाढली आहे.
सुरक्षा उपायांची गरज
वाघांच्या वाढत्या दहशतीमुळे ग्रामीण भागातील नागरिक रोजगारापासून वंचित राहत असून तेंदूपत्ता उद्योगावरच संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, जंगल परिसरात गस्त वाढवावी आणि तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
