चंद्रपूर: माणिक गढ सिमेंट कंपनीच्या ( अल्ट्राटेक )चुनखडी दगड ( लाईम स्टोन ) खाणीत कुसुंबी येथील कोलाम व आदिवासी शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. या शेतजमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी पंधरा वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्यांचा लढा प्रशासकीय पातळीवर आणि सिमेंट कंपनी सोबत सुरू आहे.
सतत पाठपुरावा करूनही हा वाद निकाली न निघाल्याने अखेर सोमवारी १३ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पाच आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांचे कार्यालयात विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून राजुरा पोलीसांनी तातडीने घटनास्थळी गाठून विष घेतलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. या सर्वांची प्रकृती गंभीर झाल्याने या पाचही आदिवासी शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
लच्चू चिन्नू मडावी ( ५५), राहणार बांबेझरी, जयराम गंगु मडावी (४५), राहणार नोकारी, जंगु सोमा पेंदोर (४८), राहणार कुसूंबी, बालाजी शिडाम (५२), राहणार नोकारी, व मारोती कर्णू तलांडे ( ५५), राहणार कुसुंबी या पाच शेतकऱ्यांनी विष घेतले. या सर्वांना राजुरा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने या पाचही आदिवासी शेतकऱ्यांना चंद्रपूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?
अल्ट्राटेक कंपनीच्या चुनखडी दगड खाणीत कुसुंबी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गेल्या १५ वर्षापासून निवेदन, आंदोलन करून हक्क मागण्याचा प्रयत्न केला, मात्र मानिकगड सिमेंट कंपनीने दाद दिली नाही आणि राज्य सरकार ने याबाबत आदिवासी शेतकऱ्यांना हक्क देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मात्र दहा महिण्यापूर्वी सर्वे नंबर ४४, ४५, ४६, ४७ या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांनी दिले. मात्र दहा महिन्यापासून मोजणी झाली नाही. मोजणी झाल्याशिवाय मोबदला अथवा ताबा मिळू शकणार नाही. अखेर संतप्त झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात विष घेतले. या प्रकरणी राजुरा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
१९ आदिवासीची जमीन कंपनीने घेतली असा कुठलाही रेकार्ड किंवा कागदपत्र नाही
सिमेंट कंपनीने सुरवातीला २४ व्यक्तींची जमीन घेतली आणि त्यांना मोबदला दिला. कुसूंबी, नोकारी व बांबेझरी या गावातील १९ आदिवासीची जमीन कंपनीने घेतली असा कुठलाही रेकार्ड किंवा कागदपत्र नाही. शेतकऱ्यांच्या मागणी नुसार अनेक सभा उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच वन विभागाकडे झाल्या. मात्र काहीच निष्कर्ष निघाला नाही. उप विभागीय कार्यालयात या आदिवासी बाबत कुठलाही प्रश्न प्रलंबित नाही. आज शेतकरी उपविभागीय कार्यालयात आले तेव्हा त्यांना या सर्व गोष्टी समजवून सांगितल्या. मात्र त्यांनी त्यापूर्वीच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलीसांना बोलावून सर्व पाचही शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले आहे. मी स्वत: रूग्णालयात जावून प्रकृतीची पाहणी केली. जिल्हाधिकारी पंत यांनीही या प्रकरणात शेतकऱ्यांच्या उपचाराकडे लक्ष देण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. रविंद्र माने,राजुरा, उपविभागीय अधिकारी
