चंद्रपूर : मृत्यू हा कधी आणि कसा येईल, याचा काही नेम नाही. आता हेच बघा ना, सकाळी तीन अपघातग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांचे प्राण वाचवणाऱ्या ‘देवदुता’चा सायंकाळी अपघातात मृत्यू झाला. विनोद आतकोटवार, असे मृताचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
नेमक काय घडलं?
रविवार, १८ मे रोजी खराळपेठ येथील शैलेश फुलझेले, गुरूदास चटारे, दामु गुडपले हे सकाळी गोंडपिपरीकडे यायला निघाले होते. गोंडपिपरी ते खराळपेठ मार्गावरील क्रीडा संकुलजवळ त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक बसली. यात शैलेश फुलझेले, गुरूदास चटारे, दामु गुडपले हे तिन्ही मित्र गंभीर जखमी झाले.
तीन गंभीर जखमींन केली मदत
दरम्यान, विनोद आतकोटवार हे याच मार्गाने जात होेते. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी पुढाकार घेतला. पोलीस व सहकाऱ्यांच्या मदतीने अपघातातील तिन्ही जखमींना गोंडपिपरीच्या रूग्णालयात दाखल केले. तिघांचीही प्रकृती नाजूक असल्याने त्यांना चंद्रपूरला शासकीय आणि खासगी रुग्णालयात नातेवाईकांच्या मदतीने हलवले.
घटनास्थळीच जीव गमावला…
संपूर्ण दिवस जखमींना मदत करण्यात व्यस्त असलेले विनोद आतकोटवार सायंकाळी गावात पोहचले. दरम्यान, जखमीपैकी शैलेश फुलझेले यांचे निधन झाल्याची बातमी आली अन् सामोरं गावात शोककळा पसरली. शैलेश फुलझेले यांच्या मृत्यूची माहिती मिळताच विनोद आतकोटवार आपली कामे आटोपून पुन्हा गोंडपिपरीकडे जायला निघाले. घाईगडबडीत जात असताना मार्गावर उभ्या ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात विनोद आतकोटवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अन् काळाने डाव साधला
सकाळपासून गावातील अपघातग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्याचा सायंकाळी अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीेन सारे गाव सुन्न झाले.
मृत विनोद आतकोटावार हे खराळपेठ येथील रहिवाशी होते. व्यवसायाने बांधकाम मिस्त्री असणारे विनोद आतकोटावार अनेकांच्या मदतीला धाउन जायचे. पण नियतीने क्रूर थट्टा केली अन् काळाने डाव साधला.
खराळपेठवासी हादरले
विनोद आतकोटावार यांना दोन मुलं आहेत. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. लोकांसाठी वेळोवेळी धावून जाणाऱ्या विनोद आतकोटावार यांचा मदत करतानाच्या धावपळीत असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. आधी शैलेश फुलझेले यांचे निधन झाले, तर सांयकाळी विनोद आकतोटावार यांचाही मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी गोंडपिपरी ते खराळपेठ मार्गावरून पायदळ जाणाऱ्या गावातीलच एका तरुणाचा अज्ञात वाहनचालकाने बळी घेतला. अपघाताच्या मालिकांनी खराळपेठवासी पूरते हादरले आहेत.
शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
सोमवारी शोकाकूल वातावरणात विनोद आतकोटावार व शैलेश फुलझेले यांच्या पार्थिवावर वढोली येथील अंधारी नदीपात्रात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांच्या मृत्यूने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.