चंद्रपूर: बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील तरुण भद्रावती तालुक्यात पावना येथे घरगुती कामासाठी गेला होता. दरम्यान तो एका पानठेल्याजवळ उभा असताना डोक्याच्या भारावर पडला. त्याला तातडीने चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात तापमाने उच्चांक गाठला असून त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राहूल विठ्ठल दानव ( 32) रा.साईबाबा वॉर्ड विसापूर असे मृतक तरुणाचे नाव आहे. त्याच्या पार्थिवावर गुरुवार ( दि. २८ ) मे रोजी दुपारी १२ वाजता विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्याच्या पश्चात आई,भाऊ, वहिनी व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहूल दानव घरगुती कामासाठी भद्रावती तालुक्यात पावना या गावी गेला होता.
वडिलोपार्जित शेतीचे कामकाज आटोपून तो विसापूर येथे परत येणार होता. मात्र, काळ त्याची वाट पाहत होता. दुपारच्या वेळेत तो गावातील एका पानठेल्याजवळ उभा होता. नेमक्या त्याच वेळी त्याला भोवळ आली. भोवळ येऊन तो डोक्याच्या भारावर पडला. यामुळे डोक्याला इजा झाली, असावी म्हणून त्याला तातडीने चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून शस्त्रक्रिया केली. मात्र डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न निष्फळ ठरले. उपचारादरम्यान राहूलचा म-त्यू झाला. आईचा आधार असलेल्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. उष्माघाताने तरुणाचा बळी घेतला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
