चंद्रपूर : धानोरा गावातून वाहणाऱ्या वर्धा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या राजू कोडापे (४०), अर्पिता राजू कोडापे (१२) या वडील आणि मुलीसह प्रियांका मडावी (१४) या तीन जणांचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी (२८ एप्रिल) घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर – गडचांदूर मार्गावरील घुग्घुस पासून जवळ असलेल्या धानोरा गावातून वर्धा नदी वाहते. मंगळवारी दुपारच्या सुमारास मजुरीचे काम करणारा राजू कोडापे, त्याची मुलगी अर्पिता कोडापे आणि प्रियांका मडावी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले होते. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात गेले आणि नदीच्या पात्रात बुडाले, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली असून मृतदेहांचा शोध सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली आहे. या दुर्देवी घटनेत वडील आणि मुलीचा दुर्देवी मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
