चंद्रपूर: वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात वाळू उत्खनन सुरू असताना सीमांकनाच्या वादातून दोन गटात झालेल्या भीषण हाणामारीत पुलगाव नगर पालिकेच्या नगरसेविकेचा पती भारत नागपाल (४२) याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान मृतक हा वर्धा जिल्ह्यातील एका आमदाराचा कट्टर समर्थक असून वाळू तस्करीत वर्चस्व स्थापन करण्यासाठी दोन गट आपसात भिडल्याने ही घटना झाली आहे. ही घटना रविवार १ मार्च रोजी रात्री १०.३०.वाजताच्या सुमारास घडली.
या जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वर्धा, वैनगंगा, उमा, ईरइ, पैनगंगा तथा इतर वाळू घाटावर राजकीय आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीचे रॅकेट सुरू आहे. या तस्करीतून आता गँगवार सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वर्धा नदीवरील बामर्डा परिसर तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरातील ढीवरी-पीपर रेती घाटांचा शासनाने अधिकृत लिलाव करून संबंधित एजन्सींना रेती उत्खननाचे काम दिले आहे.
दोन्ही अधिकृत घाट वर्धा नदीच्या पात्रात असल्याने उत्खनन करताना सीमांकनावरून यापूर्वीही वाद होत होते. रविवार १ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हा वाद अचानक चिघळला आणि दोन्ही गट आमने सामने आले. लाठ्या-काठ्यांनी झालेल्या हाणामारीत पुलगाव येथील नगरसेविका हिचा पती भारत नागपाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पाच ते सहा जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी वरोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर या हाणामारीनंतर गोळीबार आणि तलवारीने हल्ला झाल्याची चर्चा आहे.
पण, पोलिसांकडून असा काहीच प्रकार झाला नाही असे सांगण्यात आले. दोन्ही गटांत भाजपचे कार्यकर्ते असल्याचीही चर्चा आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. माहिती मिळताच वरोरा पोलिस तसेच वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वडनेर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पुढील तपास वरोरा पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान नागपाल यांचा मृतदेह हिंगणघाट येथे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे. दरम्यान या हाणामारीत पाच ते सहा वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे.
