चंद्रपूर : जंगलालगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आयुष्य आता अक्षरशः भीतीच्या छायेत गेले आहे. शेतात कामाला जाणे, गुरे चारणे किंवा पहाटे घराबाहेर पडणेही जीवावर बेतणारे ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी २०२६ ते जूनअखेर या अवघ्या सहा महिन्यांत वन्यजीवांच्या हल्ल्यांत तब्बल २३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा गंभीर वळणावर पोहोचला आहे.

वाघाच्या हल्ल्यात २१ बळी

वन विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदा वाघांच्या हल्ल्यांत २१, तर हत्ती आणि बिबट्याच्या हल्ल्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी २०२५ मध्येही वन्यजीवांच्या हल्ल्यांत ४७ जणांचा बळी गेला होता. त्यामध्ये वाघांच्या हल्ल्यांत ४२, बिबट्यांच्या हल्ल्यांत तीन, तर हत्ती आणि अस्वलाच्या हल्ल्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता.

रानटी हत्तीची ग्रामस्थांमध्ये भीती

गुरुवारी सावली तालुक्यात व्याहाड–सोनापूर मार्गावर रानटी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने या तरुणाचा मृत्यू झाल्याने या संघर्षाची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली आहे. जीव वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या या युवकाचा हत्तीने पाठलाग करून चिरडल्याची घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातून २९ मे रोजी वैनगंगा नदी पार करत चंद्रपूरच्या सावली वनपरिक्षेत्रात दाखल झालेल्या सुमारे ३२ रानटी हत्तींच्या कळपामुळे अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कळपाने शेती, घरे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, आता मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

वन्यप्राण्यांचे पारंपरिक मार्ग बघीत

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, जंगलांवरील वाढता मानवी दबाव, अधिवासांचे आकुंचन, शेतीचा विस्तार, रस्ते, खाणकाम आणि विकास प्रकल्पांमुळे वन्यप्राण्यांचे पारंपरिक मार्ग बाधित होत आहेत. परिणामी वन्यजीव मानवी वस्त्यांकडे वळत असून संघर्षाचे प्रमाण वाढत आहे.

विशेष कृती आराखडा राबविण्याची गरज

ग्रामीण भागातील नागरिकांनी वन विभागाकडे केवळ नुकसानभरपाई नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पूर्वसूचना प्रणाली, वन्यजीवांच्या हालचालींवर सातत्याने देखरेख, संवेदनशील भागांत विशेष पथके आणि दीर्घकालीन कृती आराखडा राबविण्याची मागणी केली आहे. जंगलाचे संरक्षण आणि मानवी जीविताची सुरक्षितता यांचा समतोल साधणे ही आता काळाची गरज बनली आहे. अन्यथा जंगलाच्या काठावर राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या आयुष्यातील भीतीची ही सावली आणखी गडद होत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.