चंद्रपूर : जिल्ह्यात शेकडो डीएड व बीएडधारक युवक-युवती शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असताना चंद्रपूर जिल्हा परिषदेकडून सुमारे २०० सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने पुनर्नियुक्ती करण्यात आल्याने बेरोजगार उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पात्र व प्रशिक्षित युवकांना संधी न देता निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बेरोजगारांमध्ये असंतोष
जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या संख्येने डीएड व बीएडधारक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या प्रतीक्षेत असतात. मात्र, शिक्षक भरती प्रक्रियेतील विलंब, मर्यादित पदसंख्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे अनेक उमेदवार वर्षानुवर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेकडून शाळांमधील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने बेरोजगारांमध्ये असंतोष वाढला आहे.
नियमीत भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांवर अन्याय
जिल्हा परिषदेने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी भरती प्रक्रिया राबवून त्यांना दरमहा २० हजार रुपये मानधनावर नियुक्त केले आहे. या निर्णयामुळे शाळांमधील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात भरून निघणार असली, तरी नियमित भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या युवकांनी यावर आक्षेप नोंदविला आहे.
प्रथम युवकांना संधी द्या
बेरोजगार उमेदवारांचे म्हणणे आहे की, शिक्षकांची कमतरता असल्यास प्रथम स्थानिक पात्र डीएड-बीएडधारकांना संधी देणे आवश्यक होते. अनेक वर्षे स्पर्धा परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि विविध भरती प्रक्रियांची प्रतीक्षा करूनही रोजगाराची संधी मिळालेली नाही. अशा वेळी निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय हा नव्या पिढीवरील अन्याय असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या सूत्रांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
मात्र, या निर्णयामुळे नियमित शिक्षक भरतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रिक्त पदांसाठी कायमस्वरूपी भरती प्रक्रिया कधी राबविण्यात येणार आणि पात्र डीएड-बीएडधारक बेरोजगारांना न्याय कधी मिळणार, याकडे जिल्ह्यातील युवकांचे लक्ष लागले आहे.
