अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बढती होऊन ते केंद्रात जावेत आणि मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळावे अशी इच्छा शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केल्यानंतर त्यावर महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अशा चर्चांना फारसे महत्त्व देऊ नये, समन्वय समितीत जे ठरले, त्याचा विचार झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

सर्वात मोठी कर्जमाफी

राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सुमारे ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करून निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण केले आहे.

नेतृत्वाशी चर्चा करूनच मत मांडावे

बच्चू कडू यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, महायुती सरकार अत्यंत मजबूत असून सर्व घटक पक्ष एकत्र आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे सर्वानुमते निवडलेले नेते आहेत. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असले, तरी महायुतीच्या समन्वय समितीमध्ये भूमिका मांडताना संबंधित पक्ष नेतृत्वाशी चर्चा करूनच मते व्यक्त करावीत, असे ठरले आहे. समन्वय समितीचे निर्णय कोणी पाळत नसेल, तर त्याबाबत योग्य त्या स्तरावर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवीण पोटे निवडून येणार

विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना बावनकुळे यांनी भाजप-महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रवीण पोटे हे सर्वसमावेशक उमेदवार असून ते विक्रमी मतांनी विजयी होतील. यावेळी सर्व इतिहासाचे विक्रम मोडून प्रवीण पोटे निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवनीत राणा भाजपच्या निष्ठावान

माजी खासदार नवनीत राणा यांच्या राजकीय भवितव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, नवनीत राणा या भाजपच्या निष्ठावान नेत्या असून त्या पक्षाच्या विचारधारेवर ठाम आहेत. त्या कधीही भाजप सोडणार नाहीत. एक निवडणूक पराभूत झाल्याने राजकीय कारकीर्द संपत नाही. पक्षाने त्यांना मानाचे स्थान दिले असून भविष्यात त्यांच्या भूमिकेबाबत योग्य वेळी पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.