अकोला : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांसोबत बांधावरच पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला. कोरड्या दुष्काळामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन उभे असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात येणार आहे. या काळात शेतकऱ्यांना कोणी त्रास दिला, तर तो कदापि सहन केला जाणार नाही, असा गर्भित इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.

शेतकऱ्यांच्या समस्या, अपेक्षा आणि भावना जाणल्या

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली. एकूण ४२७ शेतकऱ्यांची निवेदने त्यांनी स्वीकारून त्यांच्या वैयक्तिक समस्या, अपेक्षा आणि भावना जाणून घेतल्या. सावकारी, पाणी टंचाई, कर्ज आणि इतर विविध विषयांवर शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. विविध विषयांवरील मागण्यांची निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी महसूल मंत्र्यांनी संवाद साधला. सर्वांच्या मागण्या समजून घेऊन त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांच्या या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना तातडीने मदत देण्यात येईल, हे सरकार शेतकऱ्यांचेच आहे, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, महापौर शारदा खेडकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत मसने, महादेव मानकर, अमित कावरे, गिरीश जोशी, डॉ. शंकरराव वाकोडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

येवता येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महसूल मंत्र्यांनी अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शेतकरी शेख रशीद शेख इस्माईल यांच्या शेतात पाहणी केली. शेख रजू शेख रशीद यांनी शेतात विहीर असतानाही पाण्याची कमतरता, भूजल पातळी खालावल्याने होणारा त्रास याबाबत माहिती दिली. यावेळी प्रदीप हागे, सरपंच वंदना शिरसाट, गोपाल चांदुरकर, संजय वाडेकर, बळीराम ढोरे, काशीराम भोयर, प्रकाश हागे, मुकुंदराव हागे, दीपक भोयर, दीपक गोपनारायण, किशोर जायले, दिलीप गोपनारायण, उमेश मुरूमकर, माधव हागे, गजानन धोत्रे यांनी आपल्या व्यथा मांडल्या. बाळापूर तालुक्यातील मानकी येथेही महसूल मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. दुष्काळामुळे खरीप हंगामातील संपूर्ण पीक करपले असून महसूल मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. पुढे ते बुलढाणा जिल्ह्यातील दौऱ्यासाठी रवाना झाले.