अमरावती : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करता आले नाही. त्यावरुन आता राजकीय रणकंदन माजले आहे. या दरम्यान भाजप खासदार मनोज तिवारी आणि कंगना रणौत यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.

विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पंतप्रधानांवरही हल्ला करायचा होता, असा सनसनाटी आरोप हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी केला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्या पद्धतीने विरोधक वागत आहेत, त्यावरून तर त्यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे, असेच दिसून येत आहे. काँग्रेस पक्षच ‘मेंटली रिटायर्ड’ झाला आहे. खरेच त्यांच्या बुद्धीची कीव येते. एकीकडे संपूर्ण जगभरात, देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मान्यता मिळालेली असताना संसदेच्या लोकमंदिरामध्ये अशा प्रकारची निदर्शने करणे आणि अशा प्रकारची कृती करणे हे लोकशाहीला मान्य नाही.

अत्यंत वाईट वर्तन अशाच शब्दात त्याचे वर्णन करता येईल. काँग्रेस पक्षाने पुढील काळात अशा प्रकारचे वर्तन करू नये. देशातील जनतेने काँग्रेसला झिडकारलेले आहे आणि अशा पद्धतीचे काँग्रेसचे वागणे असेल, तर पुढच्या काळात काँग्रेस पक्ष हा देशातून हद्दपार होईल. जनता अशा प्रकारची कृती सहन करत नाही.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला निवडणुकीत सहकार्य करावे आणि महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन व्हावी, अशीच त्यांची इच्छा होती. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चाही झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत देखील चर्चा झाली होती. आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी महापौरपदाचा अर्ज भरतानाच आम्हाला पाठिंबा दिला होता.

आज मी संजय खोडके यांची भेट घेतली. या भेटीला महापालिका निवडणुकीचा संदर्भ नव्हता, तर दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीला सभा आयोजित करण्याचे ठरले आहे, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी संजय खोडके यांची भेट घेतली. अमरावती शहरात नुकताच एमडी या अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. पुढील काळात अमरावती शहर अमलीपदार्थमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.