नागपूर : निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता लांबणीवर गेले आहेत. ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित होते, फक्त त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे होत्या. मात्र चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आता सर्वच निकाल लांबले आहेत. यामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास झाला असून सर्वच पक्षांच्या नेत्यांचा विरोध असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात माध्यमांशी बोलताना केली.
बावनकुळे पुढे म्हणाले की, राज्य सरकारने अनेकदा निवडणूक आयोगाशी चर्चा केली, पत्रव्यवहार केला; परंतु आयोगाने कुठलीही दखल घेतली नाही. हा घोळ अनाकलनीय आहे. येणाऱ्या निवडणुका मोठ्या आहेत, त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हा घोळ संपवावा. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागितल्याची माहिती आहे.
आयोगाने जे चुकीचे झाले ते दुरुस्त केलेच पाहिजे. राज्याच्या जनतेस वेठीस धरणे योग्य नाही. राज्य निवडणूक आयोगाला कोणी सल्ला दिला हे माहित नाही. आम्ही २५ वर्षांपासून निवडणुका लढवत आहोत. मी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार झालो, परंतु असा घोळ कधीच पाहिला नाही. राज्य निवडणूक आयोग पहिल्यांदाच अशी चूक करताना दिसत आहे, त्यामुळे आमची तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी सांगितले.
नेमके काय म्हणाले बावनकुळे?
राज्य शासनाचा यात हस्तक्षेप असल्याचा आरोप विरोधकांतील काही जण करीत आहेत. मात्र राज्य निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. यात आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले असून जनतेने महायुती आणि भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महायुती सरकारने विकासाचे मॉडेल दिले आहे, त्या आराखड्याला जनतेने कौल दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला आहे. भाजपला ५१ टक्के मतदान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
