नागपूर : दिल्लीत कॉंग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीची महारॅली सुरू आहे. भाजपच्या सर्वच नेत्यांच्या निशान्यावर राहुल गांधी असून यावरून आज, रविवारी सकाळी ठाणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चीनकडून पैसा मिळत असल्याचा आरोप केला. नागपुरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही २०२४ मधील निवडणुकीवर केलेल्या आरोपावरून राहूल गांधी यांच्यावर टीका केली.
राहूल गांधींबाबत नेमक काय म्हणाले बावनकुळे?
५ नोव्हेंबर रोजी नागपुरात होणाऱ्या पदयात्रेची माहिती देण्यासाठी चिटणवीस सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी त्यांनी लोकशाही संस्था, संविधानिक प्रक्रिया आणि मतदार यादीची शुद्धता याबाबत जनजागृती करण्यासह विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या कथित दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशव्यापी ‘लोकशाही वाचवा – अराजकता हटवा’ अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
२०२४ मधील निवडणूक बेकायदेशीर असल्याच्या आरोपाचा समाचार घेत बावनकुळे यांनी राहूल गांधी यांना अल्झायमर झाला असल्याचे सांगितले. राहूल गांधी थोड्या थोड्या वेळाने काही गोष्टी विसरून जातात, असे त्यांनी नमुद केली. २०२४ मध्येच कॉंग्रेस पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या, अशी आठवणही बावनकुळे यांनी काढून दिली.
एसआयआर प्रक्रियेत भाग न घेता उलड्या बोंबा
एसआयआर प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. यात अद्यापही कॉंग्रेसला कार्यकर्ते लावून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्याची संधी आहे. परंतु ते यात भाग घेत नाही आणि उलट्या बोंबा ठोकून नकारात्मक वातावरण राहूल गांधी तयार करीत आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. केरळचे मुख्यमंत्री चेन्नीथला यांनी एसआयआर प्रक्रिया चांगली झाल्याने कॉंग्रेसला केरळमध्ये यश मिळाल्याचे कबुल केले आहे. आता सत्तेच्या लालसेपोटी राहूल गांधी वेडे झाले असून देशातील युवकांना हाताशी धरून विदेशी ताकदीचा साथ देण्याचा प्रयत्न ते कारीत आहेत. त्यामुळे युवकांपुढे खरी बाजू यावी, यासाठी ‘लोकशाही वाचवा – अराजकता हटवा’ अभियानांतर्गत नागपुरात २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीची शुद्धता, पात्र नागरिकांचे मतदानाचे अधिकार तसेच लोकशाही आणि संविधानिक संस्थांच्या विश्वासार्हतेबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
काय म्हणाले होते राहूल गांधी?
२०२४ ची निवडणूक बेकायदेशीर आहे. १३.३ कोटी मते वगळून कोणी ही निवडणूक कायदेशीर आहे असे म्हणू शकत नाही, असे ट्विट राहूल गांधी यांनी केले होते. त्यावरून बावनकुळे यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. समाजाला भरकटविण्याचे काम राहूल गांधी करीत असून त्यांचा बुरखा उघड केला जाईल, असे बावनकुळे म्हणाले.
