नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोपाची धार तीक्ष्ण केली आहे. काल, रविवारी ठाकरे बंधुंनी राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शब्दाचे बाण सोडले. यावर सोमवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधुंवर तोंडसुख घेताना त्यांच्या पक्षाच्या अधोगतीचे कारणेही सांगितली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही; पण त्यांच्या पक्षाची अधोगती होत आहे, याचे कारण प्रचाराची चुकीची दिशा आणि घेतलेले निर्णय आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री हिंदू आहेत का?’ या केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. विकासाचा अजेंडा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जात असून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची दिशा आणि फोकस चुकत आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने मतदान मागितले गेले; मात्र आता विकासावरच मतदान मागावे लागणार आहे, असे ते म्हणाले.  उद्धव, आदित्य सोन्याचा चमचा घेऊन आले…

कॉंग्रेसलाही धरले धारेवर

‘लाडकी बहीण’ योजनेवर काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस पक्ष नेहमीच या योजनेच्या विरोधात राहिला आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसची सरकारे आहेत, तेथे ही योजना बंद झाली; न्यायालयात गेले असता त्यांना धक्का बसला. आता मकरसंक्रांतीला लाभार्थींना पैसे मिळत असतानाही त्यांचा विरोध आहे. काँग्रेसचे रक्त महिलाविरोधी आहे, अशी तीव्र टीका त्यांनी केली. लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाच्या आक्षेपांबाबत ते म्हणाले की, ही योजना आजची नाही; नियमितपणे सुरू असलेली योजना असल्याने आचारसंहितेचा भंग होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग ही योजना बंद करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.