नागपूर : उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठणाच्या आंदोलनाची घेतलेली भूमिका ही केवळ राजकीय फायद्यासाठी असल्याची टीका महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नागपूर विमानतळावर शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले
खूप दिवसांनी उद्धव ठाकरे यांना कोणीतरी चांगली बुद्धी दिली आहे, याचा आनंद आहे. मात्र, रामरक्षा पठण किंवा प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन आता राजकीय फायदा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी ठेवू नये. ते म्हणाले, महाराष्ट्राने तो काळही पाहिला आहे, जेव्हा अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळी संपूर्ण राज्य उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार की नाही, याची वाट पाहत होते. मात्र, त्यांनी अयोध्येला जाणे टाळले. काँग्रेससोबतच्या आघाडीमुळे आणि मतांच्या राजकारणासाठी त्यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. ते कायमच हिंदुत्त्ववादी भूमिकेपासून दूर जात असून, त्याचा प्रत्येक प्रत्येकवेळी आलेला आहे.
हनुमान चालीसा पठण
हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी माजी खासदार नवनीत राणा यांना १४ दिवस तुरुंगात राहावे लागले. खरं तर त्यावेळी नवनीत राणा यांनी कोणता गुन्हा केला होता. मात्र, तरीही त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे आज रामरक्षा पठणाच्या माध्यमातून हिंदुत्वाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न हा केवळ राजकीय हेतूने केला जात असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी कायम राजकीय हेतूच पाहिला आहे. त्यांनी कधीही त्यापलीकडे जाऊन भूमिका मांडली नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हा प्रयोग फार काळ टिकणार नाही
सध्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते दूर जात असल्याने त्यांच्या भावना पुन्हा आपल्या बाजूने वळविण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, हा प्रयोग फार काळ टिकणार नाही. काँग्रेसच्या विचारसरणीशी केलेली त्यांची तडजोड पुन्हा त्यांना त्याच मार्गावर घेऊन जाणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, हिंदुत्व हा भारतीय जनता पक्षासाठी श्रद्धेचा विषय आहे, तर उद्धव ठाकरे यांची सध्याची भूमिका ही राजकीय सोयीसाठी बदललेली भूमिका असल्याचे जनतेलाही स्पष्टपणे दिसत आहे. राजकीय सोयीसाठी भूमिका बदलणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा हा प्रयोग यशस्वी होणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
